रोज फक्त सहा प्राणायाम करा, नैराश्य, ताणतणाव कायमचा घालवा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 13, 2021 08:00 AM2021-01-13T08:00:00+5:302021-01-13T08:00:07+5:30

योगसाधनेमुळे प्राणायाम हा शब्द आपल्या सर्वांच्याच परिचयाचा झाला. तरीदेखील प्राणायामाबद्दल अजूनपर्यंत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

प्राणायामाच्या पूरक, कुंभक, रेचक या तीन अवस्था आहेत. पूरक आणि रेचक यांचा अर्थ अनुक्रमे संथ लयीत श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे. तर कुंभक अवस्थेत फुप्फुसात घेतलेला श्वास काही क्षणात संपूर्ण फुप्फुसात भरून राहतो व शरीरात आवश्यक ऊर्जा निर्माण करतो. दिवसभर काम करून थकवा आला असल्यास लागोपाठ सहा प्राणायाम केल्यावर तात्काळ ताजेतवाने वाटते व थकवा पळून जातो.

प्राणायामात श्वसनसाधना केली जाते. श्वसनसाधनेत शक्य तेवढ्या जास्त वेळ श्वास रोखून धरला जातो. श्वास जितका वेळ जास्त धरून ठेवता येईल, अर्थात कुंभक जितका जास्त वेळ करता येईल, तेवढी प्राणायामात गती होते.

प्राणायामामुळे मनोविकास होतो, मन एकाग्र होते. विशेषत: विद्याथ्र्यांनी प्राणायामाचा अभ्यास जरूर करावा. तसेच ज्यांना नैराश्य, थकवा जाणवतो, त्यांनी नियमित प्राणायाम करावा.

प्राणायामामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो. शरीराची संपूर्ण यंत्रणा श्वासोच्छ्वासावर अवलंबून असते. नियमितपणे प्राणायाम करणाऱ्या साधकाच्या श्वासावाटे घेतला जानारा प्राणवायू फुप्फुसातील सर्व नसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढून शरीराचे आरोग्य उत्तम राखले जाते. चिंतन, मनन, ध्यास, निदिध्यास, धारणा या अवस्था विकसित होत जातात.