1 / 10स्कोडा कंपनीने काही महिन्यांपूर्वी एक छोटी एसयुव्ही भारतीय बाजारात आणली होती. ती गरजेचीही होती. कारण इतर कंपन्यांच्या कार या श्रेणीत येत होत्या आणि स्कोडाच्या कुशाक सारखी एसयुव्ही मध्यम वर्गाच्या बजेटबाहेर जात होती. कॉम्पॅक्ट सेदान, छोट्या हॅचबॅक वापरणारा मोठा वर्ग, तरुण तुर्क आदी हे एसयुव्हीच्या दिशेने जात होते. या वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी स्कोडाने कायलॅक ही कुशकची छोटी बहीण म्हणायला हरकत नाही, ती बाजारात आणली आणि आकड्यांचा गेम पलटायला सुरुवात झाली. हीच कायलॅक परंतू मॅन्युअल गिअर बॉक्स असलेली आम्ही पुण्यातून पार अगदी आंबा घाटापर्यंत आणि तिथून पुन्हा पुण्यापर्यंत चालविली. मायलेजने तर अपेक्षित आकडा दिलाच परंतू भल्या भल्यांचे १.० लीटर इंजिनचे मिथकही मोडून काढले. चला पाहुया कशी वाटली...2 / 10जुलैच्या पहिल्या आठवड्यात तसा पावसाचा जोर कमीच होता. परंतू घाट परिसरात थांबून थांबून सरी कोसळत होत्या. वाटेत पाऊस फारसा लागला नसला तरी खड्डे आणि त्यातील चिखलाचे पाणी समोरून वाहने येताच धो-धो करून कोसळत होते. रस्ता चिखलमय होता, यामुळे थोडा सांभाळूनच प्रवास सुरु केला होता. टँक फुल केला तेव्हा कायलॅकच्या ओडोमीटरवर ५५० किमीची रेंज दाखवत होती. प्रवास तसा जाताना गुगल मॅपनुसार २४१ किमी एवढा होता, त्यामुळे परत पुण्यात परतताना पेट्रोल भरावे लागणार, असाच प्लॅनिंग करून गाडी बाहेर काढली. 3 / 10सकाळची वेळ असल्याने पुण्यातील शहरातील सिग्नल वगळता ट्रॅफिक फारसे नव्हते. पुणे सोडण्याच्या या प्रवासात कारने १२-१३ चे मायलेज दिले. पुढे हायवेवर कारने आम्हाला पार अगदी १८.३ किमी प्रति लीटर टच करून दाखविले. परतीच्या वेळी येताना सायंकाळी ५-६ वाजता मस्तपैकी ट्रॅफिक लागले, यात कारने ९-१० चे मायलेज मिळाले. कारच्या सुरुवातीच्या दाखवत असलेल्या रेंजनुसार आम्ही पुन्हा पेट्रोल भरले का? तर उत्तर आहे नाही. आम्ही पुन्हा पेट्रोल भरले नाही. निघताना जेवढे पेट्रोल भरलेले त्याच पेट्रोलमध्ये आम्ही बिनधास्त जाऊन आलो. ओडोमीटरनुसार आम्ही 467 किमी कार चालविली आणि आणखी १६० किमी कार जाऊ शकते, असे दिसले. 4 / 10आता वळुयात इंजिनकडे... कारचे इंजिन १.० लीटर क्षमतेचे आहे म्हणून अनेकजण थोडे नाक मुरडतात. परंतू, इतर कंपन्यांच्या १.० लीटरची क्षमता वेगळी आणि या इंजिनची हे आम्हाला या हायवे, खड्डेमय रस्ते, ट्रॅफिक आणि घाटाताली वळणांच्या चढ-उताराच्या रस्त्यांवर जाणवले. स्कोडा कायलॅकच्या या टर्बो पेट्रोल इंजिनाने आम्हाला कुठेही नाऊमेद केले नाही, अगदी कराडवरून आंबा घाटाकडे जाताना लागणाऱ्या डोंगररांगांतील हेअरपिन सारख्या वळणावर सुद्धा. कार या घाटात चौथ्या-तिसऱ्या गिअरमध्ये आरामात चढत होती. कारमध्ये वजन नव्हते असे नाही चारजण आणि त्यांचे लगेज देखील होते. तरीही आम्हाला कुठे इंजिन जीव टाकतेय असे वाटले नाही. यामुळे कायलॅकला १.० लीटर इंजिन दिलेय, काय पावर देणार, हे जे मनातील विचार होते ते यामुळे पळून गेले.5 / 10आता कारचा परफॉर्मन्स पाहिला, स्कोडाने 8 लाखांच्या आत एक्स शोरुम किंमत ठेवलेली असली तरी कुशाक आणि कायलॅकच्या प्रिमिअममध्ये काहीही फरक जाणवला नाही. दोन्ही कारमधील मटेरिअल, क्वालिटी आणि फिचर्स तसे सारखेच आहेत. फक्त फरक एवढाच आहे की कायलॅक थोडी छोटी बनविण्यात आली आहे. असे असले सहा फुटांचा व्यक्ती पुढेही आणि पाठीमागेही आरामात बसू शकतो एवढी लेगस्पेस, सीट कुशनिंग आणि प्रिमिअमनेस देण्यात आलेला आहे. शिवाय बुटस्पेसही मोठी आहे. ही किमया स्कोडाने कमी लांबी, रुंदीच्या कारमध्ये साधली आहे. 6 / 10वळणावर कार कुठेही रस्ता सोडतेय, असे वाटले नाही. जास्त बॉडीरोलही जाणवला नाही. व्हिजिबिलीटी चांगली होती. रात्रीच्यावेळी लाईटचा थ्रो देखील रस्त्यावर चांगली दृष्यमानता देत होता. मध्येच पावसाची सर लागत होती, यामुळे रस्ते निसरडे होते. तरीही ८० च्या स्पीडला कुठेही कार चळतेय किंवा कंट्रोल सुटतोय असे वाटले नाही.7 / 10कारमध्ये पुढील सीट या व्हेंटिलेटेड होत्या. यामुळे घामाचा प्रश्न आला नाही, एसीची गार हवा सीटच्या कुशनमधून अनुभवता येत होती. भारतीय मागणीप्रमाणे या कारमध्येही सनरुफ देण्यात आलेला आहे. आम्ही धुळीच्या रस्त्यावर सनरुफ उघडला नाही, परंतू निसर्गरम्य भागात गेल्यावर याचा अनुभव जरूर घेतला. स्कोडा कायलॅकचा म्युझिक सिस्टीमचा आवाज चांगला वाटला. कुठेही थरथर आवाज ऐकायला आला नाही. 8 / 10कायलॅकमध्ये ३ सिलिंडर इंजिन दिलेले असले तरी केबिनमध्ये त्याचा आवाज तसा नगन्यच येतो. १७ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. सस्पेंशन चांगले असल्याने खड्ड्यांचे दणके जाणवले नाहीत. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी तशी ठीक वाटली, रात्रीच्या वेळी थोडे लक्ष देऊनच रिव्हर्स कॅमेरा वापरावा. पाठीमागे दोन मोठ्या व्यक्ती आरामात बसू शकतात. 446 लीटरची बुटस्पेस असल्याने तुम्ही आरामात ४-५ दिवसांचे, चार-पाच जणांचे साहित्य नेऊ शकता. इन्फोटेन्मेंट सिस्टीम स्मूथ आहे. त्यावर तुम्हाला कारची मायलेज, टीपीएमएस आदीची माहिती पाहता येते. आम्ही अॅप्पल कारप्ले वापरला, अँड्ऱॉईड ऑटो देखील वापरला. रस्ता माहिती असला तरी अनुभव घेण्यासाठी मॅपही वापरून पाहिला. कुठेही आम्हाला लॅग जाणवला नाही. म्युझिकसाठी देखील आम्ही या स्क्रीनवरील बटनांचा वापर केला. 9 / 10कारचे इंटिरिअर म्हणाल तर तुम्हाला प्रिमिअम फिल देणारे आहे. या कारमध्ये सहा एअरबॅग येतात. एबीएस, ईबीडी, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, रोलओव्हर प्रोटेक्शन आणि हिल होल्ड असिस्ट ही सुरक्षेची फिचर्स आहेत. भारत एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. एक्स्टीरिअर स्कोडा कुशाकसारखे आहे. कार पुढून छोटी वाटत नाही परंतू बाजुने पाहिली तर छोटी असल्याचे दिसते. आतील ड्युअल टोन इंटेरिअर छान वाटते. तुम्हाला क्रूझ कंट्रोल देखील मिळतो. अँबिअंट लाईटिंगही आहे. परंतू, या गोष्टी तुम्हाला व्हेरिअंटनुसार मिळतील. 10 / 10ज्यांना कमी किंमतीतली प्रिमिअम कार हवी आहे, अपग्रेड करायचे आहे, तसेच ज्यांची फॅमिली चार जणांची आहे, त्यांच्यासाठी स्कोडा कायलॅक हा चांगला पर्याय आहे. पेट्रोल असली तरी बऱ्यापैकी चांगले मायलेज ही कार देते. तुम्हाला एक प्रिमिअम फिलही देते. लांबच्या प्रवासासाठी देखील ही कार आम्हाला चांगली वाटली. मुख्य म्हणजे किंमत देखील आवाक्यात आहे जी बाजारातील अन्य कार कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक आहे. शिवाय सुरक्षितताही आहे, सर्व्हिस चांगली मिळण्याची शक्यता आहे. इतर कंपन्यांप्रमाणे खराब सेवा मिळण्याची शक्यता कमी आहे.