आडगाव बाजार (जि. परभणी) : जिंतूर-औंढा मार्गावरून पायी जाणाऱ्या दीपक विलास दराडे (वय २५, रा. चिंचोली दराडे) या युवकाचा भरधाव दुचाकीच्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. दीपक दराडे याच्या मृत्यूनंतर आईवडील, भाऊ-बहिणी यांनी त्याचे दोन नेत्र, दोन किडनी, एक लिव्हर, दोन फुप्फुसे, हृदय गरजवंत रुग्णांना प्रत्यारोपण करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपक दराडे हा २१ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास जिंतूर औंढा रस्त्यावरील फिल्टरवरून पायी जात होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीचालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्यास जोरदार धडक दिली. यात दीपक दराडे गंभीर जखमी झाला. त्यास चिंचोली येथील माधव दराडे, शिवाजी काळे यांनी तत्काळ धाव घेत परभणी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना २२ फेब्रुवारीला रात्री दीपक दराडे याची प्राणज्योत मालवली.
दीपक दराडे याच्या पश्चात आईवडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूनंतर आईवडील, भाऊ-बहिणी यांनी त्याचे दोन नेत्र, दोन किडनी, एक लिव्हर, दोन फुप्फुसे, हृदय गरजवंत रुग्णांना प्रत्यारोपण करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिंतूर औंढा राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र येथील पुलाच्या अर्धवट कामावर काही ठिकाणी मुरुमाचे ढिगारे पांगविण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.