प्रमोद साळवे
छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाची इंस्टाग्राम स्टोरी का ठेवली असा दहशतीने जाब विचारत शहरातील एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री ८:३० वाजता घडली. गंगाखेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी ८ आरोपींविरुद्ध गुन्हा रात्री नोंदविण्यात आला. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे शहरातील जातीय तणाव टळला आहे.
अविनाश उमा खवडे (वय २२ वर्षे रा.नगरेश्वर गल्ली) या युवकाने शुक्रवारी (दि.२१) रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दि.२१ रोजी दुपारी ३:३० वाजता त्याच्या इन्स्टाग्राम आयडी वर छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्या संदर्भाने एक स्टोरी (रिल्स) ठेवली होती. त्यानंतर रात्री ८:३० वाजता संबंधित युवकास शहरातील राज मोहल्ला परिसरातील काही युवकांनी लगतच्या नगरेषेवर गल्लीतील महादेव मंदिराजवळ जमाव जमा करून शर्ट फाडून बेदम मारहाण केली. भांडण सोडवणाऱ्या शिवाभैय्या टोले यासही चापट मारली. आरोपीं सोबत २० ते २५ तरुणांचा जमाव होता.
या भांडणादरम्यान शहरात नगरेश्वर गल्लीत जातीय भांडणे सुरू झाल्याची चर्चा पसरली. घटनेचे गांभीर्य ओळखत प्रशिक्षणार्थी सहा.पोलीस अधीक्षक तथा पोलीस ठाणे प्रभारी ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनीही शहरात भेट देत शांततेचे आवाहन केले.
याप्रकरणी फिर्यादी अविनाश उमा खवडे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आयान रिजवान फैजल सर्व राहणार राज मोहल्ला यांचेसह अनोळखी एक अशा व इतर एकुण ८ जणांविरुद्ध भा.न्या.सं. १८९(२), ११५(२), ३५१(२), १३५ अन्वये उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा ठाणे प्रभारी ऋषिकेश शिंदे हे स्वतः करीत आहेत. शहरात सध्या शांततेचं वातावरण आहे.