सेलू (मोहन बोराडे)- पाथरी आगाराच्या धावत्या बसचे पाठीमागील दोन्ही चाके निखळून पडल्याची घटना आज(दि.११) सकाळी मोरेगावजवळ घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. घटना घडली, तेव्हा बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांस जवळपास ४० प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा ते सेलू बस क्रमांक (एमएच २० बीएल ११२५) पाटोदा येथून शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन सेलूकडे येत होती. देवगाव फाटा महामार्गावरील मोरेगाव नजीक डाव्या कालव्याजवळ धावत्या बसचे उजव्या बाजूची पाठीमागील दोन्ही चाके निखळून पडल्याने बस जागेबरच बसली. देवगाव फाटा महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. याच वेळी समोरुन आणि पाठीमागून वाहने येत होती.
परंतु, बसचालक हनुमान सारुक यांनी प्रसंगावधान साधून बसच्या वेगावर वेळीच नियंत्रण साधल्याने मोठा अपघात टळला. या घटनेनंतर पाथरी आगाराच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.