जिंतूर तालुक्यातील जोगवाडा ते वरूड या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ही बाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भातील प्रश्न जिंतूरच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी शासनाकडे उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने ग्रामविकासमंत्री सहन मुश्रीफ यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. त्या म्हटले आहे की, जोगवाडा ते वरूड हा रस्ता जिल्हा मार्ग क्रं. ४ दर्जाचा आहे. सदर रस्ता हा काळ्या मातीच्या भागातून जात असल्याने तसेच वरूड नृ. या गावात खदान असल्याने प्रमुख्याने खदानीच्या वाहनांमुळे सदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते, या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव २०२०-२०२१ मध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडे जिल्हा परिषदेमार्फत सादर करण्यात आला असल्याचे मुश्रीफ म्हणाले. ज्या खदानीतील वाहनांमुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्या खदान मालकावर कारवाई करण्याबाबत मात्र मुश्रीफ यांनी चकार शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांना खदानीतील वाहने जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST