जिंतूर ( परभणी) : छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या हॉस्पिटलसमोर दुचाकी चोरून जिंतूर येथील एमआयडीसी मध्ये आणून विक्री करण्यास देत असलेल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस स्थानकाच्या पथकाने जेरबंद केले. एकनाथ महादु मुंडे ( 27 वर्षे, रा. शेवडी, ता. जिंतुर, जि.परभणी) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 23 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 26 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील वेगवेगळ्या हॉस्पिटल समोरून अनेक दुचाकी चोरीस गेल्या आहेत. तपासा दरम्यान सिडको पोलिसांना दुचाकी चोर जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस पथकाने 11 एप्रिल रोजी मोठ्या शिफायतीने एकनाथ महादू मुंडे यास जिंतूर बसस्थानकासमोरून ताब्यात घेतले. चौकशी केली असता मुंडे याने चोरीची कबुली देत सर्व दुचाकी जिंतूर एमआयडीसी परिसरात ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 26 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
रुग्णालयाबाहेर चोरी अन् दुचाकी थेट जिंतूरमध्येशेवडी येथील एकनाथ महादु मुंडे जिंतूर येथील शिवाजीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. छत्रपती संभाजीनगर येथे आल्यानंतर त्याला येथील एमजीएम हॉस्पीटल, मिनी घाटी, आदि मोठ्या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर रुग्णाच्या नातेवाईकांच्या गाडी उभ्या असतात हे दिसले. नातेवाईक रुग्णांच्या काळजीत असल्याने सहसा दुचाकीकडे कोणाचे जास्त लक्ष नसते, हीच संधी साधत एकनाथ मुंडे याने अनेक रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरल्या. दुचाकी थेट जिंतूर एमआयडीसी परिसरात नेऊन लपवून ठेवत असे. त्यानंतर जसे गिऱ्हाईक सापडेल तसे दुचाकी विकण्याचा गोरख धंदा मुंडे याने सुरू केला होता.