परभणी : सराईत गुन्हेगारी इसमाच्या टोळीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चाप बसविला आहे. यामध्ये टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य अशा दोघांना एक वर्षाच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश एसपींनी काढले आहेत.
विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण करून इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे, दुखापत पोहोचविणे, खुनाचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र आणि गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, मारहाण करणे दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या जिल्ह्यातील दोघांना हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली हद्दीतील टोळी प्रमुख शेख फारूक शेख मोबीन व सदस्य तुळशीराम दर्शनकर (दोन्ही रा.साखला प्लॉट, परभणी) यांच्यावर असेच गंभीर गुन्हे असल्याने कोतवाली पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची प्राथमिक व अंतिम चौकशी करून नमूद दोघांना बारा महिन्याच्या कालावधी करिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी काढले आहेत.