लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्याने चार आगारांतून शनिवार व रविवार या दोन दिवसात केवळ सहा बसेस सोडण्यात आल्या. या बसेसनी १ हजार १११ किलोमीटरचे अंतर पार करून १८ हजार ६९४ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा एस. टी. महामंडळाला जोरदार फटका बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून २२ मार्च २०२०पासून वारंवार लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. या निर्णयाचा एस. टी. महामंडळाला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी या चार आगारांमध्ये २५५ बसेस आहेत. या बसच्या दररोजच्या फेऱ्यांमधून २९ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, वीकेंड लॉकडाऊनमध्ये एस. टी. महामंडळाला गेल्या दोन दिवसात केवळ १८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
दोन दिवसात २९ लाखांचा फटका
एस. टी. महामंडळाच्या चारही आगारांमधून पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू असल्यास महामंडळाला दोन दिवसात सर्वसाधारणपणे २९ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद एस. टी.ला मिळत नाही. त्यामुळे गंगाखेड आगारासह इतर काही आगार बंद ठेवण्यात आली. केवळ सहा बसेस रस्त्यावरून धावल्या. या बसफेऱ्यांमधून जवळपास २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते.
वीकेंड लॉकडाऊन असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १ हजार १११ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून केवळ १८ हजार ६९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाला मोठा फटका बसला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ५० टक्केच कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळातही ५० टक्के कर्मचाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. शनिवारी व रविवारी तर या ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या हातालाही काम नव्हते.
आगारातील एकूण बसेसची संख्या
२५५
दोन दिवसात धावलेल्या बसेस
०६
फेऱ्या झाल्या आगारामध्ये
१२
पैसे मिळाले दोन दिवसात
१८,६९४