अडीच हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:56+5:302020-12-06T04:17:56+5:30

कुपटा : तालुक्यातील तूर पिकावर उमळा रोग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अडीच हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. ...

Two and a half thousand hectares of tur crop in danger | अडीच हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात

अडीच हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात

Next

कुपटा : तालुक्यातील तूर पिकावर उमळा रोग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अडीच हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस या नगदी पिकांबरोबरच तूरच पिकही शेतकऱ्यांच्या हातून जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस व तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही पिके चांगली बहरली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातून सर्वाधिक उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही तूर पिकावर होती. सेलू तालुक्यात जवळपास अडीच हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने तूर पीक बहरले आहे. मात्र हे पीक काढणीला येताच सेलू तालुक्यातील कुपटा, कान्हाड, हट्टा, गव्हाण, गुळखंड, आडगाव, सिमणगाव, भांगापूर या गावातील तूर पिकावर उमळा रोग आला आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीन, मूग, कापूस या पिकांपाठोपाठ आता तूर पिकही शेतकऱ्यांच्या हातून जाते की काय, असा सवाल शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे याकडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापठातील शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी बळीराजातून होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच विद्यापीठातून शास्त्रज्ञांची टीम आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र तूर पिकावर पडलेला उमळा रोगाबाबत एकाही शेतकऱ्याने माहिती दिली नाही. उमळा हा अनेक कारणांमुळे होत असतो. या संदर्भात शास्त्रज्ञासह पिकांना भेट देऊन कारण शोधले जाईल.

आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलू.

पहिल्यांदा दोन-तीन झाडे उमळली होती. मात्र आम्हाला वाटले पाणी कमी पडत असल्यामुळे हा प्रकार होत आहे. मात्र त्यानंतर साडेचार एकरवरील सर्वच तूर उमळली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलो आहे. प्रशासनाने तत्काळ पाहणी करून मदत द्यावी.

कृष्णा डोंबे, शेतकरी, कान्हाड

Web Title: Two and a half thousand hectares of tur crop in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.