जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला असून, रुग्णांची संख्याही कमी झाली आहे; परंतु बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही घटलेले नाही. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंता वाढल्या आहेत. मंगळवारी एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात २, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ३, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ५ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या १२ रुग्णांमध्ये ८ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारी २ हजार ७०५ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २ हजार ३१५ अहवालांमध्ये २३१ आणि रॅपिड टेस्टच्या ३९० अहवालांमध्ये ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही मिळून २८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ७२१ झाली असून, आतापर्यंत ४२ हजार ८२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १५३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ७५३ रुग्ण उपचार घेत आहेत.
१७० रुग्णांना सुटी
मंगळवारी जिल्ह्यातील १७० रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली. मागील दोन आठवड्यानंतर प्रथमच बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.