सुरक्षा भिंतींची खांबे निखळली
गंगाखेड : येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म दोनच्या बाजूस असलेल्या सुरक्षा भिंतीची खांब निखळले आहेत. त्यामुळे रात्री- अपरात्री व दिवसा नागरिकांना स्थानकात सहज प्रवेश करण्याकरता येऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन सुरक्षा भिंतीची निखळलेली खांबे तत्काळ बसवावेत, अशी मागणी रेल्वे प्रवाशातून होत आहे.
महामार्गावर साचले पाणी
परभणी : शहरातील भारत नगर परिसरातील परभणी- जिंतूर या महामार्गावरील कॅनॉलवरील पूल परिसरात खड्डे पडल्याने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत लागत आहे. त्याचबरोबर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन कॅनॉल पुलावरील खड्डे बुजवावीत, अशी मागणी वाहनधारक आतून होत आहे.
वातावरणातील बदलाने शेतकरी चिंताग्रस्त
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अधून-मधून पावसाच्या सरी ही बरसत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील सध्या काढणीस आलेल्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. वातावरणातील या बदलामुळे ज्वारी, गहू या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.
महात्मा फुले यांची जयंती साजरी
पाथरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जाेतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सभापती अनिलराव नखाते यांच्या हस्ते म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती एकनाथराव शिंदे, चक्रधर उगले, विश्वंभर साळवे, शिवाजी नायकल, दगडू पाटणे,बी. जी. लिपणे यांची उपस्थिती होती.
कोरोना लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद
गंगाखेड: तालुक्यातील धारासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.तालुक्यातील धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १० मार्चपासून ते आजपर्यंत ६०० लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.