वाहतुक कोंडीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:58+5:302021-06-04T04:14:58+5:30

शहरातील बाजारपेठ गुरुवारपासून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. यामुळे सकाळी दहा ते दुपारी ...

Traffic jams plague motorists | वाहतुक कोंडीने वाहनधारक त्रस्त

वाहतुक कोंडीने वाहनधारक त्रस्त

googlenewsNext

शहरातील बाजारपेठ गुरुवारपासून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत नागरिक तसेच नोकरदार व ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांची विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यातच नारायण चाळ हा परिसर मोंढा तसेच स्टेशन रोड व बाजारपेठेला जोडणारा मुख्य चौक आहे. शहरात प्रवेश केलेली अनेक वाहने या मार्गे मोंढ्यात दाखल होतात. यासह शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, जनता मार्केट, नानलपेठ, कडबी मंडी आदी भागातील रस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, ठराविक भागांमध्येच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामुळे चौकांमध्ये होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनधारकांनाच प्रयत्न करावे लागत आहेत.

ट्रक, टेम्पोमुळे अडथळा

शेती साहित्याची ने-आण करणाऱ्या तसेच किराणा मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. रस्ते अरुंद असल्याने एकावेळी एकच मोठे वाहन ये-जा करू शकते. त्यामुळे छोटी, मोठी वाहने अडकून पडत आहेत.

सिग्नल बंद असल्याने अडचण

शहरातील जिंतूर रोड तसेच वसमत रोड या भागासह बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सिग्नल व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, हे सिग्नल बंद आहेत. सिग्नल व्यवस्था सुरू केल्यास वाहनधारक स्वतःहून शिस्त पाळून ये-जा करू शकतील. परंतु, सिग्नल बंद असल्याने वाहने बिनदिक्कतपणे मिळेल त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: Traffic jams plague motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.