प्रमोद साळवे, गंगाखेड (जि.परभणी) : पालम शहरात रविवारी सायंकाळी पावने सहाच्या सुमारास बालाजी नगर डेपोजवळ भीषण अपघात झाला. यात पानटपरी खाली उतरविताना बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागल्याने सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (३१) व शेख शौकत शेख मुसा (४०, दोघे रा.बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने पालममधील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जखमींमध्ये शेख फरहान शेख महेबूब (१६), आसेफ शाखेर शेख (१८) व शेख असलम शेख गुड्डू (रा.आयेशा कॉलनी, पालम) यांचा समावेश असून त्यांच्यावर साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना शेख शफीक शेख मुसा यांची पानटपरी बैलगाडीतून घराजवळ उतरविताना रविवारी सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास घडली. यात बैलगाडीवरील पानटपरी घसरून लोखंडी दांडीवर आदळली आणि ती थेट मुख्य लाईनच्या विद्युत तारेला लागल्याने हा भीषण प्रकार घडला. या घटनेने पालम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पालम ठाण्याच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणी जखमी तसेच मयत यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.