परभणी : तिरुपती येथून साईनगर शिर्डीला जाणारी साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे क्रमांक १७४१७ ही पूर्णा स्थानकावरून बुधवारी पहाटे साडेचार वाजता परभणीकडे निघाली असता या रेल्वेच्या एस-आठ आणि एस-१० या शयनयान श्रेणीच्या बोगीमध्ये काही चोरट्यांनी घुसून विविध प्रवाशांना धाक दाखवून मोबाईल, पर्स यासह विविध साहित्य बळजबरी चोरून नेले. हा प्रकार पूर्णा ते परभणी दरम्यान घडल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र, याबाबत परभणी जीआरपी आणि आरपीएफ स्थानकात कोणताही गुन्हा नोंद झाला नाही किंवा तक्रारही आली नाही.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, तिरुपती-शिर्डी रेल्वे बुधवारी पहाटे पूर्णा येथून परभणीकडे निघाली असता दोन शयनयान आरक्षित डब्यात हा चोराचा प्रकार घडला. या डब्यातील प्रवाशांजवळील मोबाईल, बँग, साहित्य, दागिने असा ऐवज चोरट्यांनी विविध प्रकारच्या साहित्याचा धाक दाखवून लुटला. यानंतर या डब्यातील प्रवासी घाबरले होते. परभणी रेल्वे स्थानकात या प्रवाशांनी उतरुन ही माहिती रेल्वे स्थानकातील पोलिसांना दिली. मात्र, याप्रकरणी कोणताही गुन्हा बुधवारी दूपारपर्यंत दाखल झाला नव्हता. यानंतर काही वेळ रेल्वे परभणी स्थानकावर थांबली होती.
या डब्यातील प्रवाशांनी ही माहिती देण्यासाठी स्थानकावरील आरपीएफ आणि जीआरपी पोलीस ठाणे गाठले. मात्र, केवळ या ठिकाणी एकच पोलीस कर्मचारी आढळून आला. अनेक प्रवाशांनी यामुळे संताप व्यक्त केला. यापूर्वी सुद्धा जिल्ह्यात गंगाखेड - परभणी, मानवत - परभणी आणि पूर्णा- परभणी दरम्यान विविध एक्सप्रेस रेल्वेत चोरीचे असे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, आरपीएफ आणि जीआरपी पोलीस यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नाही. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या माहितीवरुन या विशेष रेल्वेत या दोन्ही डब्यात एकही पोलिस कार्यरत नव्हते.
प्रवाशांनी दिली माहितीपरभणी तालुक्यातील झरी भागातील मिर्झापूर आणि अन्य एका गावातील काही युवक आणि प्रवासी तिरुपती येथून परभणी येथे या रेल्वेने परत येत होते. त्यांनी सदरील घडलेल्या प्रकाराला पूष्टी दिली.