- प्रमोद साळवे
गंगाखेड ( परभणी): ऐन पोलीस ठाण्यासमोरच वर्दळीच्या डॉ.आंबेडकर चौकात आज, बुधवारी ( दि.१२) दुपारी २ वाजता 'रोड रॉबरी'ची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एसबीआय बँकेतून काढलेली ३ लाख ८८ हजारांची रोकड दुचाकीस्वाराच्या मानेला झटका देऊन चोरट्यांनी पळवली आहे. विशेष म्हणजे, ऐन पोलीस स्टेशन समोरील चौकातील 'सीसीटीव्ही' बंद असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माधवराव बालासाहेब शिंदे यांनी शहरातील एसबीआय बँकेतून ३ लाख ८८ हजार रुपये काढले होते. एका स्कुटीवर बसून जोशी नामक व्यक्तीसोबत शिंदे बँकेतून बाहेर पडले. बँकेपासून १५० मीटर अंतरावर असलेल्या डॉ. आंबेडकर चौकात येताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी शिंदे यांच्या मानेला झटका देत काही कळायच्या आत रोख रक्कम असलेली पिशवी पळवली. घाबरलेल्या माधवराव शिंदे यांनी हाकेच्या अंतरावरील पोलीस ठाण्यात धावत जाऊन पोलिस अधिकाऱ्यांना माहिती सांगितली. मात्र, उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले.
अखेर माधवराव शिंदे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांनी पोलीस ठाण्यात बोलावले. जि.प.सदस्य शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना मोबाईलवर तत्काळ घटना सांगितली. आयपीएस शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत शहराच्या चारही बाजूला नाकाबंदी केली. शेजारील सर्व पोलीस ठाण्यांना घटनेची माहिती दिली. आयपीएस शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लोणीकर, पीएसआय शिवाजी सिंगनवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, चोरट्यांचा कोणताही मागमूस लागला नाही.
मुख्य सीसीटीव्ही बंद, पोलिसांची गोचीशहरातील पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या डॉ.आंबेडकर चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांची चोरीचा तपास करताना मोठी गोची झाली. पोलिसांना आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याची नामुष्की आली. दोन ते अडीच तास अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होती. भरदिवसा ठाण्यासमोरच अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर 'रोडरॉबरी' झाल्याने खळबळ उडाली आहे.