- मारोती जुमडे
परभणी: शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, पेरणी ते कापणीपर्यंत मनरेगाच्या माध्यमातून कामाची उपलब्धता आणि दिव्यांग नागरिकांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी रात्री पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर तर आ.डॉ. राहूल पाटील यांच्या घरासमोर टेंभा मशाल आंदोलन केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हातामध्ये टेंभा मशाल, गळ्यात निळा गमछा व भगवा झेंडा हातात घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे , हमीभाव मिळाला पाहिजे , दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे अशा जोरदार घोषणा देत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधण्यात आला. परभणीतीलआंदोलनात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
तर सोनपेठ येथील आंदोलनात मानवत तालुका प्रमुख माणिक राठोड, पाथरीचे तालुका प्रमुख दीपक खुडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात देण्यात आलेल्या निवेदन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांनी तर पाथरीचे आ. राजेश विटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून आमदारांच्या निवासस्थानांसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.