पालम : शहरात १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोरोना नियंत्रण करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या बंदोबस्तावर असताना एका माथेफिरूने नगर पंचायत रस्त्यावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरूला अटक केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनचा कडक बंदोबस्त केला जात आहे. १७ एप्रिल रोजी पोलीस पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली असून, बाजारपेठेत दुकाने पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. पोलिसांचे वाहन सर्वत्र फिरून सूचना देत कारवाई करत आहे. जुन्या गावात नगर पंचायत परिसरात पोलिसांची गाडी जात असताना एका माथेफिरूने अचानक गाडीवर दगड फेकून मारला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी पळून जाणाऱ्या माथेफिरूला अटक केली आहे. पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.