लसीकरणात सोनपेठची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:45+5:302021-07-25T04:16:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मागच्या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांनी लसीकरण केले असून, ...

Sonpeth lags behind in vaccination | लसीकरणात सोनपेठची पिछाडी

लसीकरणात सोनपेठची पिछाडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : मागच्या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांनी लसीकरण केले असून, सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी २३ हजार ८५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर प्रशासनाने लसीकरणावर भर दिला. गावो-गावी जनजागृती झाली; परंतु कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांची उदासिनता, यामुळे लसीकरणाचा वेग अजूनही वाढलेला नाही. जिल्ह्यात १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला तेव्हा सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी २३ हजार ८५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात १९ हजार २११ नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला असून, ४ हजार ६४८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. परभणी तालुक्यात मात्र लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तालुक्यात आतापर्यंत १ लाख १८ हजार ८७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणाऱ्या नागरिकांची संख्या ३२ हजार ३१० एवढी आहे. ग्रामीण भागात वेग वाढविण्याची गरज आहे.

लसीच्या तुटवड्याचा परिणाम

मागील १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे दररोज १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी दोन ते अडीच हजार डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती कमी झाली आहे.

जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक केंद्रावर लसीकरण केले जाते; मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध नसल्याने ७० ते ७८ केंद्रांवरूनच लसीकरण सत्र राबवावे लागत आहे. लसीअभावी इतर केंद्र बंद राहत आहेत.

कर्मचाऱ्यांचीही लसीकरणाला पाठ

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण केले जात असताना दुसरीकडे आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनीदेखील लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १४ हजार ३७२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी ११ हजार ४७८ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. तर कोरेाना योद्धा असलेल्या २८ हजार ७६७ कर्मचाऱ्यांपैकी २८ हजार ६०६ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे.

१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करावयाचे आहे. त्यात ज्येष्ठांनी पुढाकार घेतला असून, ४५ वर्षांपेक्षा पुढील २ लाख ८८ हजार ९२८ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यात २ लाख १९ हजार ७७२ जणांनी पहिला तर ६९ हजार १५६ जणांनी दोन्ही डोस घेतले.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ३ लाख ९३ हजार २३२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, १ लाख ४ हजार ३३६ नागरिकांनी दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करून घेतले आहे.

Web Title: Sonpeth lags behind in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.