- मारोती जुंबडेपरभणी : आई-वडिलांची भेट, घरचा ओलावा आणि गावाची ओढ… याच भावनेने मांडाखळी येथील अतिश अनिल जाधव (२५) आणि कृष्णा अनिल जाधव (१८) हे दोन सख्खे भाऊ सोमवारी परभणीहून आपल्या गावाकडे निघाले होते. मात्र ब्राह्मणगाव फाट्यावर नियतीने असा घाला घातला की मोठ्या भावाचा प्रवास कायमचा थांबला, तर धाकटा भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे.
रांजणगाव येथील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेला अतिश आई-वडिलांना भेटण्यासाठी परभणीत आला होता. भाऊ आलाय ही बातमी कळताच कृष्णा आनंदाने त्याला घेण्यासाठी परभणीत पोहोचला. भेटीनंतर दोघेही दुचाकी क्र. एमएच २२ एजी ०२४२ वरून मांडाखळीकडे निघाले. वाटेत ब्राह्मणगाव फाट्यावर मांडाखळीकडे वळण घेत असतानाच गंगाखेडहून परभणीकडे येणाऱ्या ट्रकने क्र. केए ३२ एए ११८४ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. क्षणार्धात सगळं संपलं. अतिशचा जागीच मृत्यू झाला. धाकटा भाऊ कृष्णा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गुणवंतराव शिनगारे यांच्यासह पोलीस जमादार संजय अशोकराव पुरी, श्याम एकनाथराव काळे, पोलीस अमलदार उत्तरेश्वर मुंजाबा घुगे व बाबा शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमी कृष्णाला रिक्षाद्वारे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अतिशचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय दवाखान्यात हलविण्यात आला. गंभीर जखमी कृष्णा सध्या उपचार घेत असून तो वाचेल या आशेवर संपूर्ण कुटुंब आणि गाव डोळे लावून बसले आहे. मांडाखळी येथे शेती करून कुटुंबाचा संसार चालविणाऱ्या अनिल जाधव यांच्या घरात एका क्षणात आनंदाचे रूपांतर आक्रोशात झाले. सकाळी घरातून हसत निघालेला मुलगा संध्याकाळी परत येणार नाही, याची कल्पनाही कुणाला नव्हती. आई-वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मांडाखळी गाव सुन्न झाले आहे. प्रत्येक डोळ्यात अश्रू तरळत असून भेटीसाठी आले… पण कायमचे निघून गेले अशी हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : Two brothers traveling to see their parents met with a fatal accident near Brahman Gaon. One brother died instantly, while the other is critically injured. The village mourns the loss.
Web Summary : अपने माता-पिता से मिलने जा रहे दो भाइयों का ब्राह्मण गाँव के पास दुखद हादसा हो गया। एक भाई की मौके पर ही मौत हो गई, जबकि दूसरा गंभीर रूप से घायल है। गाँव में शोक की लहर है।