परभणी : कोरोनाबाधित झालेल्या ८१ ते ९० वर्षे वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. मागील वर्षभरात या वयोगटातील १४.६ टक्के रुग्ण मृत्यू पावले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असून, त्याचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. रुग्णांवर उपचार करीत असतानाच दाखल झालेले रुग्ण, उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण यांचा डेटा तयार करून त्यानुसारही निष्कर्ष मांडले जात आहेत. याच निष्कर्षानुसार वर्षभरामध्ये ८१ ते ९० वर्ष वयोगटातील १९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण इतर वयोगटाच्या तुलनेत सर्वाधिक ठरले आहे.
बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोनावर उपचार करून कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतात; परंतु याच काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही जणांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शून्य ते १० वर्ष या वयोगटात आतापर्यंत ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला. १० ते २० वर्ष या वयोगटांमध्ये १ हजार ९६ रुग्ण नोंद झाले होते. त्यातील केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. २१ ते ३० या वयोगटातील २ हजार ७२ रुग्ण नोंद झाले असून, त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ६० वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंत १ हजार ५७२ रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात १२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण ८.२ टक्के एवढे आहे. ७१ ते ८० या वयोगटामध्ये ६४० रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण ११.६ टक्के आहे. ८१ ते ९० या वयोगटातील १३० रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण १४.६ टक्के असे सर्वाधिक ठरले आहे. त्यामुळे इतर वयोगटांच्या तुलनेत ८२ ते ९० या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेव्हा सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शतक पार केलेले दोन्ही रुग्ण ठणठणीत
कोरोनाने सर्वजण त्रस्त झाले असताना दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाचा प्रतिकार करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शंभरी ओलांडलेल्या दोन रुग्णांना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना झाला. विशेष म्हणजे, दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
मागील वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. या दोन्ही महिन्यांमध्ये प्रत्येकी १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील कोरोनाच्या संसर्ग काळातील हे १०५ मृत्यू सर्वाधिक ठरले आहेत. एप्रिल २०१९ महिन्यात १, मे २, जून १, जुलै ४२, ऑक्टोबर २७, नोव्हेंबर १७, डिसेंबर १०, जानेवारी २०२० मध्ये ९, फेब्रुवारी १३ आणि मार्च महिन्यामध्ये ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.