कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील आदेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याने दिसून आले आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालनही करत नाहीत. या कार्यालयात अधिक नागरिक येत असल्याने होणारी गर्दी रोखणे कठीण आहे. शिवाय या कार्यालयाच्या परिसरात १० ते १२ इतर शासकीय कार्यालये आहेत. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या विचारात घेता, कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असल्याने १५ ते ३० एप्रिल या कालावधीत नवीन वाहन नोंदणी, वाहन विषयक कामे, वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे-उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवाना विषयक कामे, शिकाऊ अनुज्ञप्ती व त्या विषयक कामे, दुय्यमीकरण व नूतनीकरण, आदी कामकाज गर्दी होऊ नये, म्हणून बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली. ज्यांनी या कालावधीत अपाॅइंटमेंट घेतल्या आहेत, त्यांनी त्या रद्द करून पुन्हा नवीन अपाॅइंटमेंट घ्याव्यात, यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १ मे पासून कार्यालय नियमित सुरू राहील, असेही नखाते म्हणाले.
आरटीओ कार्यालयाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST