परभणी : राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेत गुंतवणूक करून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात परभणी जिल्ह्यातही गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात राजस्थानी मल्टीस्टेटच्या मुख्य संस्थापक चंदुलाल बियाणी यास आर्थिक गुन्हा शाखेकडून बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात संबंधिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
परभणी जिल्ह्यात परभणी, सेलू, गंगाखेड येथे राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटी स्थापन करून या बँकेच्या शाखेत ग्राहकांनी केलेल्या गुंतवणुकीची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये परभणी, गंगाखेड अशा दोन ठिकाणी जवळपास दोन ते अडीच कोटींची ग्राहकांची फसवणूक झाली. यातील मुख्य आरोपी चंदुलाल बियाणी यास परभणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने अंबाजोगाई येथून ताब्यात घेतले. यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आर्थिक गुन्हा शाखेकडून परभणी जिल्ह्यातील सोसायटीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू आहे तसेच आरोपीची गंगाखेड तालुक्यातील जमीनसुद्धा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हा शाखेने दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवराज जमदाडे करीत आहेत. नागरिकांनी अधिकच्या व्याजाला बळी न पडता बँकेची तसेच सोसायटीची संपूर्ण माहिती काढूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेने केले.