परभणी जिल्ह्यात जप्त केलेल्या वाळू लिलावातून चार कोटींचा महसूल जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 06:54 PM2017-12-28T18:54:39+5:302017-12-28T18:55:56+5:30
जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे.
परभणी : जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या प्रमुख तीन नद्या असून नदीकाठावरील वाळू घाटांचा लिलाव करुन या ठिकाणची वाळू प्रशासन विक्री करते. यातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र काही घाटांचा वाळू लिलाव झाला नसतानाही त्या ठिकाणाहून वाळूचा उपसा केला जातो. जिल्ह्यात नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करुन या वाळूची वाहतूक जिल्हाबाहेरही केली जात आहे. विशेष म्हणजे काही जणांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्यानंतर या वाळूचे शेत शिवारामध्ये साठेही केले. या साठ्यातून दामदुप्पट दराने वाळू विक्री करुन व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळूच्या वाहतुकीबरोबरच अवैध वाळू साठे जप्त करण्याची मोहीमही हाती घेतली होती. प्रत्येक महिन्यात ही मोहीम राबविण्यात आली. जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलावही करण्यात आले.
एप्रिल २०१७ ते डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकूण २४९ वाळू साठ्यांचे लिलाव केलेले आहेत. या लिलावामध्ये २४ हजार ४८५ ब्रास वाळू विक्री केली असून त्यातून प्रशासनाला ४ कोटी २८ लाख ५८ हजार २४७ रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाळू साठ्यांच्या लिलावाबरोबरच अवैध वाळू वाहतूक विरुद्धही मागील दहा महिन्यात कारवाई झाली. या कारवाईत आरोपींकडून दंडाची रक्कम प्रशासनाने वसूल केली आहे. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावांसह जप्त केलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावातूनही प्रशासनाच्या महसुलात भर पडली आहे.
पालम तालुक्यातून मिळाली सर्वाधिक रक्कम
जिल्हा प्रशासनाने सर्वच्या सर्व तालुक्यात वाळूसाठे जप्त करण्याची कारवाई केली होती. त्यात पालम तालुक्यात जप्त वाळू साठ्यांच्या लिलावातून सर्वाधिक १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. पूर्णा तालुक्यातून ८८ लाख ५७ हजार रुपये, परभणी तालुक्यात ७१ लाख ६१ हजार, गंगाखेड ५८ लाख ८१ हजार, सोनपेठ २१ लाख २३ हजार, जिंतूर १४ लाख ६८ हजार, मानवत ९ लाख ५४ हजार, पाथरी २ लाख ६९ हजार आणि सेलू तालुक्यात जप्त केलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावामधून ६६ हजार ११९ रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असल्याची माहिती या विभागातून देण्यात आली.
२४ हजार ब्रास वाळूचा लिलाव
९ महिन्यांच्या या काळात जिल्हा प्रशासनाने जप्त केलेल्या वाळू साठ्यातून २४ हजार ४८५ ब्रास वाळू विक्री केली. त्यात पालम तालुक्यात ८ हजार ९३३, परभणी ४ हजार ७५६, पूर्णा ४ हजार ८९४, गंगाखेड २ हजार ३५६, जिंतूर १ हजार ४७१, सोनपेठ १ हजार ४१०, मानवत ४७७, पाथरी १५०, सेलू तालुक्यात ३७ ब्रास वाळूची विक्री झाली.