परभणी : लसीकरणासाठी दररोज सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू होत असून, अवघ्या पाच मिनिटांत लसीकरण केंद्र फुल्ल होत असल्याने नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे.
कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाला असतानाही गर्दी टाळण्यासाठी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच लस दिली जात आहे. मात्र, नोंदणी करताना अनेक अडचणी निर्माण होतात. लस उपलब्ध असल्यास सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रांचे स्लॉट ओपन होत आहेत. मात्र, अवघ्या पाचच मिनिटात केंद्रांवरील लसीकरणाचे बुकिंग फुल्ल होत असल्याने नागरिक जाम वैतागले आहेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने नागरिक जाम वैतागलेले आहेत. कधी लसीचा कोटा उपलब्ध नसतो तर कधी कोटा उपलब्ध असूनही बुकिंग फुल्ल झाल्याने लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी किंवा ठरावीक केंद्रांवरील लसीचा कोटा वाढवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
ओटीपी वेळेत मिळेना
लस घेण्यासाठी सेल्फ रजिस्ट्रेशन केल्यानंतर एखाद्या केंद्रावर लसीचा कोटा उपलब्ध असल्यास तातडीने नोंदणी करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, वेळेत ओटीपी मिळत नाही. उशिराने ओटीपी मिळाल्यास नोंदणी करेपर्यंत या केंद्रावरील कोटा संपलेला असतो, अशी समस्या दररोज निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता यात तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.