दरवर्षी पावसाळ्यामध्ये साथ रोगांचा फैलाव वाढतो. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने डासांपासून पसरणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि हवेतून पसरणाऱ्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यू, चिकनगुन्या, घोडागौर हे आजार जिल्ह्यात पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या साथ रोगापासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छता करावी. डासांची उत्पत्ती होणार नाही, या दृष्टीने घरगुती उपाय केल्यास साथ रोगापासून बचाव होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस
यावर्षीच्या पावसाळ्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत भरपूर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ताण दिला आहे. या महिन्यात २३ तारखेपर्यंत १८० मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १०८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे केवळ ६० टक्के पावसाची नोंद झाली.
वातावरण बदलले; काळजी घ्या...
वातावरणातील बदल विषाणूंसाठी नेहमीच पोषक असतो. त्यामुळेच ऋतू पालट होताना साथीचे आजार पसरतात.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढतात. पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, काविळ या आजारांचा फैलाव होतो. डबक्यातून होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, चिकनगुन्या, संसर्गजन्य ताप या साथी पसरतात.
दरवर्षीच साथ रोग उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.