परभणी : तालुक्यातील पारवा शिवारातील शेत आखाड्यावर ३ जानेवारीला झालेल्या अत्याचार आणि मारहाण, चोरी प्रकरणातील दुसऱ्या कुख्यात गुंडाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री ताब्यात घेतले.
पारवा शिवारात आखाड्यावर तीन जानेवारीला रात्री अनोळखी इसमांनी शेत आखाड्यावर येऊन पीडितेवर अत्याचार करून तिच्या पतीला हत्याराने जखमी करून जबरदस्तीने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील एका आरोपीला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपींचा शोध पथकांमार्फत घेणे सुरू असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्ह्यातील फरार आरोपी गुप्ता उर्फ सुरेश शंकर शिंदे (२४, रा.पांगरी, ता. परळी, जि.बीड) हा पूर्णा परिसरात लपून राहत असल्याचे समजले. त्यावरून पथकाने सापळा रचून यास रेल्वे पटरी भागातून ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील कारवाईसाठी परभणी ग्रामीण ठाण्यात हजर करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील सपोनि.राजू मुत्येपोड, उपनिरीक्षक अजित बिरादार, अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, किशोर चव्हाण, जमीरुद्दीन फारुकी, निलेश परसोडे, गणेश कौटकर यांनी केली.