एसटी महामंडळाला लाखोंचा फटका
परभणी : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आल्याने महामंडळाला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दररोज १७ ते १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या परभणी विभागातील उलाढाल मागच्या सात दिवसांपासून ठप्प आहे.
अंतर्गत रस्त्यांची शहरात दुरवस्था
परभणी : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेक वसाहतींमध्ये या खड्ड्यात पाणी साचून चिखल झाला आहे. मनपा प्रशासनाने किमान वसाहतीमधील खड्डे बुजवावेत व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अस्थायी अतिक्रमणांमुळे वाहतुकीची समस्या
परभणी : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सध्या संचारबंदीमुळे रस्ते मोकळे असले, तरी संचारबंदी उठल्यानंतर अतिक्रमणे पुन्हा स्थिरावतात. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक रहात नाही. गर्दी हटविण्यासाठी ही अतिक्रमणे दूर करावीत व रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवावा, अशी मागणी होत आहे.
भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी
परभणी : संचारबंदीमुळे बीट बंद असल्याने भाजीपाला उत्पादकांचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असून, भाजीपाल्याची नासाडी होत आहे. काही जणांनी शहरात वसाहतींमध्ये फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे, परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना, तसेच उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे.