परभणी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत असून, १४ फेब्रुवारी रोजी परभणी शहरात पॉवर पेट्रोल १००.७६ रुपये प्रतिलीटर या दराने विक्री झाले. दरवाढीने जिल्ह्यात शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे.
पेट्रोलच्या उच्चांकी दरामुळे परभणी जिल्हा देशभरात चर्चेला आला आहे. मागील काही महिन्यांपासून परभणीतील पेट्रोलचे दर राज्यात सर्वाधिक आहेत. दररोज दरवाढ होत असून, रविवारी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. शहरातील पेट्रोलपंपावर रविवारी दिवसभर ९७.३४ रुपये या दराने पेट्रोलची विक्री झाली. वाहनधारकांना एका लीटरमागे ९८ रुपये मोजावे लागले, तर पॉवर पेट्रोलचे दर मात्र १००.७६ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे १०१ रुपयांना १ लीटर पेट्रोल खरेदी करावे लागले. डिझेलचे दरही वाढत असून, रविवारी ८६.७९ रुपये दराने प्रतिलीटर डिझेल विक्री झाले. शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर आता डिजिटल पेट्रोल मशीन बसविले आहेत. जुन्या पेट्रोलपंपावर केवळ दोनच डिजिट दाखविण्याची व्यवस्था होती. मात्र आता ती बदलण्यात आली आहे.
दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. बाजारपेठेतील सर्वच वस्तू आणि पदार्थाचे दरही वाढत आहेत. विद्यार्थी, घरोघरी फिरून मार्केटिंग करणारे रोजंदारी कर्मचारी, नोकरदार वर्ग या सर्वांनाच पेट्रोल दरात वाढ झाल्यामुळे फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोलवरील खर्च दुप्पट झाल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र विरोध केला जात आहे.
सर्वाधिक दराचे कारणे
वाहतूक खर्च वाढत असल्याने जिल्ह्यात पेट्रोलचे दर वाढत आहेत. मनमाड आणि सोलापूर येथील तेल डेपोतून जिल्ह्याला पेट्रोलचा पुरवठा होतो. दोन्ही ठिकाणचे अंतर साधारणत: ३०० किमीपर्यंत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे.
पेट्रोलच्या दरवाढीमुळे महिन्यातील खर्च वाढला आहे. कार्यालयात जाण्यासाठी मी स्कूटीचा वापर करते. पूर्वी ४०० ते ५०० रुपयांचे पेट्रोल महिन्याकाठी लागत होते. दर वाढल्यामुळे एक हजार रुपयांपर्यंतचा खर्च पेट्रोलवर होत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
समृद्धी वारल, परभणी
पेट्रोलसाठी प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम राखून ठेवली जाते. आतापर्यंत या रकमेत भागत होते. मात्र दरवाढ झाल्यामुळे ही रक्कम पुरत नाही. जवळपास दुप्पट पैसे महिन्यासाठी खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक बजेटतच विस्कळीत झाले आहे.
विशाखा रेडे, परभणी
खुल्या बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढलेले नाहीत. मात्र केंद्र आणि राज्य शासनाकडून पेट्रोलवर लावलेल्या करांमुळे किमती वाढत आहेत. किमती स्थिर ठेवण्यासाठी कर कमी करणे आवश्यक आहे.
विनय बांठिया, पेट्रोलपंपमालक