प्रसाद वैजनाथ रामदिनाल यांचे परळी येथे लॉज आहे. काही दिवसांपूर्वी अखिल मेहबूब शेख हा व्यक्ती लॉजवर राहण्यासाठी आला होता. तो स्वतः आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. तसेच लॉजवरील माणिक गोरे या कामगाराला साईटवर ५०० रुपये रोज याप्रमाणे कामाला लावून प्रसाद रामदिनाल यांचा विश्वास संपादन केला. याच काळात परभणी येथे प्रीती टॉकीजमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे २०० पोते शिल्लक राहिले आहेत. हे सिमेंट ६० हजार रुपयांना देतो, असे सांगितले. त्यामुळे प्रसाद रामदिनाल हे अखिल मेहबूब शेख यांच्यासोबत २४ मे रोजी परभणी येथे आले होते. यावेळी त्यांनी सिमेंटच्या व्यवहारातील ४० हजार रुपये अखिल महबूब यास दिले. उर्वरित २० हजार रुपये देण्यासाठी ते एटीएमवर गेले असता याच संधीचा फायदा घेत अखिल मेहबूब याने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे रामदिनाल यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिमेंटचे पोते देतो असे सांगून ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून आरोपी अखिल मेहबूब शेख (लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस कर्मचारी नंदकिशोर पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
परळीच्या व्यापाऱ्याला परभणीत चाळीस हजाराला घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST