परभणी जि.प. अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:07 AM2020-01-05T01:07:33+5:302020-01-05T01:07:39+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Parbhani ZP Political affairs for the presidency started | परभणी जि.प. अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी सुरु

परभणी जि.प. अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून गेल्यावेळी राष्ट्रवादीने भाजपाला सोबत घेतले होते. आता राज्यस्तरावर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आली असून त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर दिसून येत आहेत. परभणी जिल्हा परिषदेतही हे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीचे सभागृहात २४ सदस्य असून बहुमतासाठी त्यांना २८ सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे ६ सदस्य असून हे सदस्य सत्तेत सहभागी होऊ इच्छितात. शिवसेनेचे १३ सदस्य सभागृहात असून या पक्षाच्या नेत्यांनाही जिल्हा परिषदेतील सत्तेत सहभाग हवा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण एकतर्फीच आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी व शिवसेना मिळून ४३ सदस्य होतात. त्यानुसार महाविकास आघाडीचे सभागृहातील संख्याबळ वाढले असले तरी सत्तेतील वाटा कोणाला कसा द्यायचा, याच्यावरुन काही अंशी पेच निर्माण झाला आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असले तरी शिवसेनेला उपाध्यक्षपद हवे आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांनी तसे प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतच पाथरी मतदारसंघाला अध्यक्षपद मिळाल्यास उपाध्यक्षपद जिंतुरला हवे, असाही एक मतप्रवाह आहे. याशिवाय अर्थ व बांधकाम, समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण या चार विषय समित्यांचे वाटप कसे करायचे, हाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे यातील किमान दोन विषय समित्या राहू शकतात. तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक विषय समितीचे सभापतीपद मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहिल्यास शिवसेनेला दोन सभापती पद मिळू शकतात. या सर्व शक्यता असल्या तरी या संदर्भातील निर्णय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, शिवसेनेचे आ.डॉ. राहुल पाटील व काँग्रेसचे आ.सुरेश वरपूडकर यांच्या चर्चेनंतर पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आ.बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधण्यासाठी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्यांसोबतच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या सदस्यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी स्वीकारली असून त्यांच्याच प्रयत्नातून पाथरीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. ७ जानेवारी रोजी आयोजित विशेष सभेत जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होणार असली तरी तत्पूर्वीच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एका नावावर सहमती बनविण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सर्व सहमतीनेच एक नाव होणार निश्चित
४जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या निर्मलाताई विटेकर, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते आणि शालिनीताई दुधगावकर या इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आ. बाबाजानी दुर्राणी
व माजी आ.विजय भांबळे यांची मुंबईत चर्चा झाल्याचे समजते. त्यामध्ये स्थानिक पातळीवरच एक नाव निश्चित करा, अशी सूचना अजित पवार यांनी दिल्याचे समजते. आ.बाबाजानी दुर्राणी हे निर्मलाताई विटेकर यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. माजी आ.भांबळे हे शालिनीताई दुधगावकर यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी निर्मलाताई विटेकर यांच्या नावावर एकमत होण्याची दाट शक्यता आहे.
उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना आग्रही
जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळावे, यासाठी आ. डॉ.राहुल पाटील प्रयत्न करीत आहेत. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी चर्चाही केल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र याबाबत निर्णय झाला नसल्याचे समजते.

Web Title: Parbhani ZP Political affairs for the presidency started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.