लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत आणि रेशनचे धान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही रोजगार हमी योजनेची कामे सुरु नाहीत. तुरीचे विमा अॅडव्हान्स देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रक्कमेचे वाटप झाले नाही. दुष्काळग्रस्त भागात ज्या निकषाने विमा मंजूर केला जातो, त्याच निकषानुसार विमा वितरित करावा, दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडी कालव्याचे पाण्याचे आवर्तन द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.सोमवारी सकाळी १० वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही रोहयोची कामे जेसीबी मशीनच्या सहाय्याने केली जातात; परंतु, मजुरांच्या हाताला काम दिले जात नाही, असा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला.
परभणी : रोहयोच्या कामांसाठी बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:33 IST