लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रत्येकाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा, या उद्दात हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी केवळ ३२ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अद्यापही ३७३ घरे अपूर्ण असल्याचे पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीवरुन उघड झाले आहे.परभणी तालुक्यामध्ये १३१ गावांचा समावेश आहे. या गावातील काही नागरिकांना आजही आपल्या हक्काचे पक्के घर नाही. त्यामुळे या नागरिकांना किरायाच्या घरात किंवा इतर पर्यायी व्यवस्था करुन आपला निवारा करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पंचायत समितीला एका-एका वर्षासाठी उद्दिष्टही देण्यात आले. देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, असे आदेशही देण्यात आले. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला खो मिळाल्याचे दिसून येत आहे. परभणी तालुक्यासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात पंचायत समितीकडे ६३१ प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दाखल झाले होते. त्यापैकी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. पंचायत समितीने परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या ३९८ घरांना मंजुरी दिली. मंजुरी मिळालेले घरकुल वेळेत पूर्ण होईल, अशी संबंधित लाभार्थ्यांना आशा होती. मात्र प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याने ३९८ पैकी केवळ ३९१ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता देण्यात आला आहे. तसेच २७४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला आहे. विशेष म्हणजे २७४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळणे आवश्यक होते. मात्र रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदकामासाठी असलेले १८ हजार रुपये केवळ ९ लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पंचायत समितीनेही फक्त ९ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता दिलेला आहे. पंचायत समिती अंतर्गत मिळालेल्या ४०५ उद्दिष्टांपैकी केवळ ३२ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुदत संपूनही घरकुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेला प्रशासकीय पातळीवरुन खो मिळाल्याचे परभणी तालुक्यात दिसून येत आहे.
परभणी तालुक्यात केवळ ३२ घरे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:37 IST