परभणी : परभणीपंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. अवघ्या एका मताच्या फरकाने राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे रवी उत्तमराव चव्हाण यांनी सभापतीपद पटकावत सत्ता आपल्या बाजूला खेचली, तर उद्धवसेनेचे विवेक बाळासाहेब रसाळ उपसभापतीपदी विराजमान झाले. या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाली आहे.
परभणी तालुका पंचायत समितीत एकूण २० सदस्य आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) ५, भाजप ४, काँग्रेस ४, शिवसेना (शिंदे) ४, उद्धवसेना २ आणि अपक्ष १ असा पक्षीय बलाबल आहे. स्पष्ट बहुमत कोणाकडेही नसल्याने सभापती निवडीपूर्वी जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. अखेर राष्ट्रवादीने उद्धवसेना, अपक्ष व काँग्रेसच्या काही सदस्यांचे समर्थन मिळवत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.
सभापती पदासाठी ब्रह्मपुरी सर्कलमधून निवडून आलेले राष्ट्रवादीचे रवी उत्तमराव चव्हाण आणि काँग्रेसच्या दुर्गा खोंड यांच्यात थेट लढत झाली. मतदानात रवी चव्हाण यांना राष्ट्रवादीचे ५, उद्धवसेनेचे २, अपक्ष १ आणि काँग्रेसचे २ असे एकूण १० मते मिळाली. तर दुर्गा खोंड यांना शिवसेना (शिंदे) ४, भाजप ४ आणि स्वतःचे १ असे ९ मते मिळाली. त्यामुळे एका मताच्या फरकाने रवी चव्हाण यांनी विजय मिळवत सभापतीपदावर झेंडा रोवला. उपसभापतीपदी नांदापूर गणातून निवडून आलेले उद्धवसेनेचे विवेक बाळासाहेब रसाळ यांची निवड ही एका मताने झाली. त्यांनी भाजपाचे इंद्रोबा मडके यांचा एका मताने पराभव केला.
काँग्रेसचा गटनेताच राहिला अनुपस्थित सभापती निवडीत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही उघड झाले. धसाडी गणातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या दुर्गा संदीप खोंड यांनी शिवसेना (शिंदे)च्या पाठबळावर सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसचे गटनेते शेषराव देंडगे हे निवड प्रक्रियेला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. सभापती निवडीत झालेल्या या चुरशीच्या लढतीमुळे परभणी तालुक्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
Web Summary : NCP (Ajit Pawar) and Uddhav Sena secured Parbhani Panchayat Samiti leadership. Congress saw internal conflict. Ravi Chavan is chairman, Vivek Rasal, vice-chairman. Political shifts are anticipated.
Web Summary : परभणी पंचायत समिति में NCP (अजित पवार) और उद्धव सेना ने नेतृत्व हासिल किया। कांग्रेस में आंतरिक कलह हुई। रवि चव्हाण अध्यक्ष, विवेक रसाल उपाध्यक्ष बने। राजनीतिक बदलाव की संभावना है।