लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनपेक्षित घडामोडी घडून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आला़ त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी भवन परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला़ दुसरीकडे शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करीत दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल केला़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकींतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस होता़ त्यामुळे या दिवशी कोण उमेदवारी अर्ज दाखल करेल, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले होते़ प्रत्यक्षात सकाळीच राजकीय घडामोडींना वेग आला व अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ आघाडीतील चर्चेनुसार काँग्रेसकडे सोपविण्याचा निर्णय झाला़ राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यांना सकाळी १० वाजताच पक्षाचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांचा फोन आला व त्यांनी परभणीची जागा आघाडीतील चर्चेनुसार काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगितले़ त्यानंतर राष्ट्रवादीकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आ़ दुर्राणी यांनी तीन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते़ त्यानुसार शहरातील राष्ट्रवादी भवन येथे १० वाजेपासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची गर्दी झाली होती़ अचानक मतदार संघ बदलाचा निरोप आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली़ परभणी मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी यांनी शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, असे सांगितले़ अन्यही काहींनीही राजीनाम्याची भाषा केली़ यावेळी राष्ट्रवादी भवनमध्ये आ़ दुर्राणी यांच्यासह आ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विजय भांबळे, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, आ़ रामराव वडकुते आदी उपस्थित होते़ कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढल्यानंतर आ़ दुर्राणी यांनी कोणीही राजीनामा देण्याची गरज नाही़ पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला आहे़, तो आपणास मान्य आहे़ पक्षाने आपणास खूप काही दिले आहे़ त्यामुळे आपली नाराजी नाही़ कार्यकर्त्यांनीही नाराज होवू नये, असे सांगितले़ त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ सुरेश देशमुख हे राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल झाले़ यावेळी बोलताना माजी आ़ सुरेश देशमुख म्हणाले की, परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करतील व काँग्रेसला जागा सुटली तर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते काँग्रेससाठी एकदिलाने काम करतील, अशी माझी व आ़ दुर्राणी यांची यापूर्वीच चर्चा झाली आहे़ आमच्यामध्ये समन्वय आहे़ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले़ त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आ़ देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले़ यामध्ये राष्ट्रवादीचे आ़ दुर्राणी, आ़ केंद्रे, आ़ भांबळे, आ़ वडकुते, काँग्रेसचे वरपूडकर, बालकिशन चांडक, हिंगोलीचे राकाँचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जि़प़ उपाध्यक्ष अनिल पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक नेहाल शेख, विलास गोरे, जावेद राज, अनिल नैनवाणी, गणेश लुंगे, मनसेचे बंडू कुटे, विशाल गोटरे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, भगवान वाघमारे, रविराज देशमुख, हेमंत आडळकर, विजय जामकर, अनिल नखाते, अशोक काकडे, दादासाहेब टेंगसे, स्वराजसिंह परिहार, माजी खा़ सुरेश जाधव, सुनील देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी माजी आ़ देशमुख यांनी आघाडीकडून एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल केले़तत्पूर्वी शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनीही शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी दाखल केला़ वसमत रोडवरील खा़ बंडू जाधव यांच्या संपर्क कार्र्यालयापासून यानिमित्त रॅली काढण्यात आली़ या रॅलीत खा़ जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ जयप्रकाश मुंदडा, भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे, आ़ गोपीकिशन बाजोरिया, डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे, गंगाप्रसाद आणेराव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठल रबदडे, रवि पतंगे, प्रभाकर वाघीकर, डॉ़ मीनाताई परतानी आदींची उपस्थिती होती़ ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे ३ उमेदवारी अर्ज दाखल केले़युती-आघाडीचे मतदार संघ बदललेया निवडणुकीत शिवसेना-भाजपा व काँग्रेस- राष्ट्रवादी या युती व आघाडीमध्ये एका बाबतीत साम्य दर्शविणारी घटना घडली, ती म्हणजे पूर्वी शिवसेना-भाजपाची युती असताना परभणीचा मतदार संघ भाजपाकडे होता़ आता तो शिवसेनेकडे आला़ तर काँग्रेस-राष्ट्रवादीची गेल्या वेळी आघाडी असताना हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे होता आता तो काँग्रेसकडे आला आहे़काँग्रेसचे नेते ‘बी़ रघुनाथ’मधून राष्ट्रवादी भवनमध्ये़़़राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय गुरुवारी सकाळी जवळपास १० वाजता झाला; परंतु, या संदर्भातील चर्चा अर्ध्या तासात शहरभर पसरली़ पूर्वनियोजित घोषणेनुसार काँग्रेसचे उमेदवार माजी आ़ सुरेश देशमुख हे गुरुवारीही उमेदवारी अर्ज दाखल करणार होते़ त्यानुसार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनपाच्या बी़ रघुनाथ सभागृह परिसरात जमण्यास सांगण्यात आले होते़ त्यानुसार सकाळी ११ च्या सुमारास पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते येथे जमले़ त्यानंतर माजी आ़ देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर आदी पदाधिकारीही येथे दाखल झाले़ राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला सुटल्याची माहिती जाहीर होताच तिकडे राष्ट्रवादी भवनमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला़ सामूहिक राजीनामे द्यायचे, अशीही चर्चा सुरू केली़ तेथील गोंधळाची माहिती बी़ रघुनाथ सभागृह परिसरात पोहचल्यानंतर माजी आ़ देशमुख, जिल्हाध्यक्ष वरपूडकर हे राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल झाले़ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली़ राज्यस्तरावर आघाडीच्या वाटाघाटीनुसार परभणीचा निर्णय झाला आहे़ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जावू दिला जाणार नाही़ त्यांच्यासाठी आपली दारे खुली आहेत, असे सांगितले़ त्यानंतर कार्यकर्त्यांची नाराजी काहीशी दूर झाली़अन् काँग्रेस-शिवसेनेचे उमेदवार आले समोरासमोरगुरुवारी दुपारी १़४५ च्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया, त्यांचे वडील आ़ गोपीकिशन बाजोरिया, खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील आदी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाºयांकडे दाखल करून पायºयावरून खाली उतरत असताना प्रमुख प्रवेशद्वारातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ रामराव वडकुते यांची एंट्री झाली़ समोरासमोर दोन्ही उमेदवार आल्यानंतर माजी आ़ देशमुख व शिवसेनेचे आ़ बाजोरिया यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन विचारपूस केली़ तसेच यावेळी हास्यविनोदही झाला़ त्यामुळे येथील वातावरण काही वेळ हलके फुलके झाले होते़
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक : आघाडीतील घडामोडीने समीकरणे बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:23 IST