परभणी : रोजगार हमीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:50 AM2019-12-31T00:50:18+5:302019-12-31T00:50:47+5:30

मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़

Parbhani: Employment Guarantee works jam | परभणी : रोजगार हमीची कामे ठप्प

परभणी : रोजगार हमीची कामे ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़
परभणी जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले़ परिणामी शेतांमध्ये मजुरांसाठी कामे शिल्लक राहिली नाहीत़ शिवाय पीक उत्पादन झाले नसल्याने त्याचा परिणाम मोंढा बाजारपेठेतील कामांवरही झाला आहे़ अशा परिस्थितीत मजुरांना हक्काचे काम उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग कार्यरत आहे़ मात्र मागील काही महिन्यांपासून या विभागात कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांना खाजगी कामांचा शोध घ्यावा लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ३७८ कामे जिल्हाभरात सुरू होती़ या कामांवर २ हजार २७७ मजुरांना काम मिळाले आहे़ जिल्ह्यात कामांची संख्या मर्यादित स्वरुपाची राहत असल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात रोजगार हमी योजना विभागाकडे सुमारे दीड लाख मजुरांनी नोंदणी केली आहे़ या मजुरांना मागेल तेव्हा काम देण्यासाठी हा विभाग कार्यरत करण्यात आला आहे़ मात्र मागील काही महिन्यांपासून कामे वाढत नसल्याने मजुरांना खाजगी कामांकडे वळावे लागत आहे़
उपलब्ध माहितीनुसार मागील आठवड्यात ३७८ कामे सुरू होती़ त्यामध्ये ग्रामपंचायतीची २०६ आणि शासकीय यंत्रणांच्या १७२ कामांचा समावेश आहे़ इतर तालुक्यांच्या तुलनेत गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्यांमध्ये रोहयोच्या कामांची संख्या कमी आहे़ पालम तालुक्यात केवळ ७ कामे सुरू होती़ त्यावर ४२ मजुरांना काम मिळाले तर सोनपेठ तालुक्यामधील ५ कामांवर ४० मजुरांना काम मिळाले आहे़ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ९३ कामे सुरू असून, त्यावर ६११ मजुरांना काम मिळाले आहे़ त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़
ग्रामपंचायतींचीच अधिक कामे
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणेची कामे मजुरांसाठी उपलब्ध करून दिली जातात़ मात्र शासकीय यंत्रणांच्या तुलनेत ग्रामपंचायतीची कामे अधिक असल्याचे दिसत आहे़ ग्रामपंचायतीची २०६ कामे सुरू असून, त्यात घरकुलाच्या १७१ कामांचा समावेश् आहे़ तर सार्वजनिक विहिरी बांधकाम करण्याची ३५ कामे समाविष्ट आहेत़ ही दोन कामे वगळता रोहयोंतर्गत इतर कामे हाती घेतली नाहीत़ तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेने १७२ कामे उपलब्ध करून दिली आहेत़ त्यामध्ये रेशीम विभागाची तुती लागवड करण्याचे सर्वाधिक १४५ कामे आहेत़ कृषी विभागाच्या अंतर्गत फळबाग लागवडीची २४ आणि वन विभागाच्या अंतर्गत रोप वाटीका लागवडीचे तीन कामे सुरू आहेत़
४सामाजिक वनीकरण विभागाने मात्र एकही काम हाती घेतली नाही तर कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे, सीसीटी, व्हर्मी कंम्पोस्ट ही कामे केली जातात़ मात्र ती सुरू नसल्याचे दिसत आहे़
आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला़ या हंगामाची सुगी झाली नसल्याने मजुरांना काम मिळाले नाही़ याशिवाय खरीप हंगामातील पीक उत्पादन बाजारपेठेत दाखल झाले नसल्याने त्याचाही फटका मजुरांना सहन करावा लागत आहे़ तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले आणि मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत़ त्यामुळे नदीपात्रातून वाळूचा उपसा बंद पडला आहे़ त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला असून, जिल्ह्यातील हा व्यवसाय ठप्प आहे़ जिल्ह्यात बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कुटूंब इतर व्यवसायात मजुरी शोधत असून, त्यांना दररोज हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे़ अशा परिस्थितीत या मजुरांना रोजगार हमी योजनेने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Employment Guarantee works jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.