परभणी : मनपा आरोग्य केंद्राच्या इमारती पडल्या अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:06 AM2019-09-18T00:06:18+5:302019-09-18T00:06:55+5:30

महानगरपालिकेने शहरामध्ये बांधकाम केलेल्या ६ पैकी ४ आरोग्य केंद्रांच्या इमारती बांधून तयार असतानाही त्या जनतेच्या सेवेत आणण्याबाबत प्रशासनाकडून कमालीची उदासिनता दाखविली जात आहे़ परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीच्या शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़

Parbhani: The buildings of the Municipal Health Center fall apart | परभणी : मनपा आरोग्य केंद्राच्या इमारती पडल्या अडगळीत

परभणी : मनपा आरोग्य केंद्राच्या इमारती पडल्या अडगळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेने शहरामध्ये बांधकाम केलेल्या ६ पैकी ४ आरोग्य केंद्रांच्या इमारती बांधून तयार असतानाही त्या जनतेच्या सेवेत आणण्याबाबत प्रशासनाकडून कमालीची उदासिनता दाखविली जात आहे़ परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीच्या शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़
शहरामधील ५० हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे़ त्यानुसार परभणी शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांपेक्षा अधिक असल्याने किमान ७ प्राथमिक आरोग्य केंद्र शहरात कार्यान्वित असणे आवश्यक आहे़ परंतु, सद्यस्थितीत केवळ ६ आरोग्य केंद्र कार्यरत आहेत़ शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांचे आरोग्य सुधारावे, यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली असून, ती राज्यातील ९५ शहरांमध्ये राबविण्यात येत आहे़ या योजनेंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्रात किमान १५ कर्मचारी असणे आवश्यक आहे़ यात एक पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एक अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका आदींचा समावेश आहे़
परभणी शहरात कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी मुबलक प्रमाणात आहेत; परंतु, या आरोग्य केंद्रांना इमारती नाहीत़ यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राकरीता ५० लाख या प्रमाणे जवळपास ३ कोटींचा निधी मनपाला मिळाला होता़ त्यानुसार शहरातील खंडोबा बाजार, दर्गा रोड, खानापूरनगर, इनायत नगर, शंकरनगर आणि पाथरी रोडवरील भारत नगर या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला़ शंकर नगर येथील इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली नाही़ खंडोबा बाजार, इनायतनगर, साखला प्लॉट आणि खानापूरनगर येथील इमारतीचे काम पूर्ण झाले असून, त्यामध्ये साखला प्लॉट येथील इमारतीत कामकाज सुरू झाले आहे तर इतर तीन ठिकाणच्या इमारतीतील फर्निचर आणि विद्युत जोडणीची किरकोळ कामे बाकी आहेत; परंतु, ही कामेच सदरील कंत्राटदाराकडून पूर्ण केली जात नाहीत़
सदरील तीनही आरोग्य केंद्रांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊनही इतर किरकोळ कामे का केली जात नाहीत? याचा जाबही सदरील कंत्राटदाराला कोणी विचारत नाही़ महानगरपालिकेत सध्या कंत्राटी अभियंत्यांचे राज सुरू आहे़ ११ महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आलेल्या या कंत्राटी अभियंत्यांचे या कामावर नियंत्रण नाही़ परिणामी सदरील कंत्राटदारांकडे कोणीही पाठपुरावा करीत नाही़ त्यामुळे शटरचे दुकान असलेल्या जुन्या आरोग्य केंद्रांच्या खोल्यांमधूनच कामकाज पाहिले जात आहे़ त्यामुळे शहरातील नागरिक मुलभूत आरोग्य सुविधेपासून वंचित राहत आहेत़ इमारतींच्या प्रलंबित कामांसंदर्भात मनपाचे अभियंता वसिम पठाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही़
मोफत औषधी अन् २७ चाचण्या
४महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र दररोज सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ६ यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात रुग्णांना मोफत औषधी दिली जाते़ तसेच २७ प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या मोफत केल्या जातात, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली़

Web Title: Parbhani: The buildings of the Municipal Health Center fall apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.