परभणी : ११ केंद्रांवरील सर्वच कर्मचारी बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:23 PM2020-02-25T23:23:44+5:302020-02-25T23:25:27+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अन्य केंद्रावर बदली केली आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Parbhani: All staff at 5 centers changed | परभणी : ११ केंद्रांवरील सर्वच कर्मचारी बदलले

परभणी : ११ केंद्रांवरील सर्वच कर्मचारी बदलले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अन्य केंद्रावर बदली केली आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. ६१ केंद्रावर या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षांमध्ये नेहमीप्रमाणे कॉप्यांचा सुळसुळाट पहिल्या दिवसांपासूनच पहावयास मिळत आहे. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. या परीक्षेत परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर शिक्षकच विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतरही अनेक परीक्षा केंद्रावर कॉप्यांचे प्रकार सुरुच होते. २४ फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर तब्बल ६५ परीक्षार्थ्यांना कॉप्या करताना पकडण्यात आले होते. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी अधिक प्रमाणात कॉपीचा संशय असलेल्या परीक्षा केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच इतर केंद्रांवर बदल्या करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील जय भवानी उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्तंडवाडी येथील संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनपेठ तालुक्यातील उखळी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, पूर्णा येथील संस्कृती कनिष्ठ महाविद्यालय, जिंतूर तालुक्यातील बामणी येथील ब्रह्मश्वर कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथील संत तुकाराम कन्या माध्यमिक विद्यालय, परभणी येथील कारेगावरोड भागातील मन्नाथ कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, लोहगाव येथील श्री नृसिंह माध्यमिक विद्यालय, गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील कै. रेखाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय व इसाद येथील बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय या ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, लिपीक व शिपाई या सर्वांची अन्य केंद्रावर बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयास पाठविण्यात आला. या प्रस्तावास तातडीने वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी या संदर्भातील आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वाहुळ यांनी काढले आहेत. त्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चार दिवसांत : ८७ विद्यार्थ्यांवर कारवाई
४जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी कॉप्या करणाºया १५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी १, २२ फेब्रुवारी रोजी ३ व २४ फेब्रुवारी रोजी ६८ परीक्षार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहेत. तोपर्यंत परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा शिक्षणाधिकारी डॉ.वाहुळ यांनी दिला आहे.
मंगळवारी बारावीच्या परीक्षेला ३७ विद्यार्थ्यांची दांडी
४२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन सत्रात पार पडलेल्या परीक्षेला ३७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात एमसीव्हीसी विषयाची परीक्षा झाली.
४त्यामध्ये ५८७ पैकी ५६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात तर्कशास्त्र विषयाच्या परीक्षेला १२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकूण ४५७ विद्यार्थ्यांनी तर्कशास्त्र विषयाची परीक्षा दिली आहे.
जिल्हास्तरीय दक्षता समितीने केलेल्या शिफारसीनुसार बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, लिपिक व शिपाई यांच्या इतरत्र बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला विभागीय शिक्षण मंडळाने मंजुरी दिली आहे.
-डॉ.वंदना वाहुळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी, परभणी.

Web Title: Parbhani: All staff at 5 centers changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.