परभणी : विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल तसेच सोने आणि रोकड असा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी राबविली. यामध्ये बुधवारी ८६ मोबाईल मूळ मालकांना परत केले तर बोरी आणि कोतवाली हद्दीतील घटनेत दोन फिर्यादींना त्यांचे सोन्याचे दागिने, रोकड परत देण्यात आले. यामध्ये एकूण २३ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि सर्व प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मागील काही दिवसांपासून नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलबाबत प्राप्त पोर्टलवरील तक्रारींचा तपास सायबर पोलीस ठाण्याने केला. यामध्ये चौकशीअंती एकूण ८६ मोबाईल हस्तगत केले. १३ लाख ८९ हजार ९३३ रुपये किमतीचे ८६ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
साडेआठ लाख केले परत....बोरी ठाण्याच्या हद्दीत एका इसमास स्वस्त दरात सोने देतो, असे म्हणून फसवणूक केल्याचा प्रकार आठ जानेवारीला घडला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखा, सायबर व बोरी पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदारांनी आरोपीकडून आठ लाख ५० हजार नगदी हस्तगत केले होते. हे साडेआठ लाख फिर्यादीस परत केले. कोतवाली हद्दीत फिर्यादीचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरट्यांनी नेले होते. पोलिसांनी यात वीस ग्रॅम वजनाचे एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून फिर्यादीस परत केले. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोनि. शरद मरे, संजय ननवरे, सपोनि. राजेश मलपिल्लू, साईप्रकाश चन्ना, सुनील गोपीनवार, पोलीस कर्मचारी गणेश कौटकर उपस्थित होते.