शहरातील महमंद अनिस महमंद युनूस कुरेशी यांचे जुना मोंढा बकरा मार्केट परिसरात दुकान आहे. त्यांच्याकडे २ ट्रक आहेत. त्यांच्या ट्रकचे जुने टायर त्यांनी रिमोल्डिंग करण्यासाठी दुकानाच्या बाजूला ठेवले होते. मंगळवारी मध्यरात्री १.३५ च्या सुमारास त्यांचे मित्र तौफिक बागवान यांनी त्यांना त्यांच्या दुकानातील टायर एका हातगाड्यावर टाकून एक तरूण नेत असल्याचे मोबाईलवर सांगितले. त्यानंतर त्यांनी तौफिक यांना त्या तरूणावर नजर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने धाव घेऊन तौफिक बागवान व कुरेश यांनी या तरुणाला एक नंबर पोलीस चौकीजवळ पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाव दिनेश रमेशराव घटमाळ (रा. भोईगल्ली, परभणी) असल्याचे सांगितले. या तरूणास पकडून त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात आणले. याबाबत कुरेशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून दिनेश घटमाळ याच्याविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टायर चोरताना एकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST