परभणी : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने रविवारी शहरातील विविध प्रकरणातील गंभीर गुन्ह्यात समावेश असलेल्या चार टोळीतील २२ जणांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. यामध्ये निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही प्रकारचे गुंडागर्दी सहन केली जाणार नाही असा सज्जड दम पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी भरला आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने यापूर्वीच्या दहा वर्षातील विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील सहभाग असलेल्या चार टोळीतील २२ सदस्यांवर मोका लावण्याची कारवाई प्रस्तावित केली होती. याबाबतचा प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक कालावधीत सुद्धा असा प्रयोग केला होता. तसेच आता मनपा निवडणुकीत कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी, दहशत निर्माण केली जाऊ नये यासाठी या सर्वांची झाडाझडती घेण्यात आली. रविवारी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी या सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून समज दिली. यावेळी स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.