- विठ्ठल भिसेपाथरी : पाय दुखतोय, पण लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलन थांबवणं शक्य नाही. माझ्या वेदना गौण आहेत; आरक्षण महत्त्वाचं आहे, असं सांगत पायाला फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेतच पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील शेतकरी विठ्ठल काळे (४०) मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले. गंगाखेड, परभणी येथील संदीप गव्हाणे यांनी सायकलवरून मुंबई गाठली आहे. सारोळा बु. येथील तरुणांनी तर आंदोलनस्थळी मुंडण आंदोलन करीत निषेध केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केल्याच्या दिवशीपासून परभणी जिल्ह्यातील गावागावांतून समाज बांधवांचे मोर्चे निघाले. पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावसारख्या गावातून सत्तर ते ऐंशी तरुण, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यात विठ्ठल काळे यांच्या पायाला प्लास्टर असतानाही काळे यांनी आंदोलनात जाण्याचा निर्धार केला. पुढच्या पिढ्यांसाठी आरक्षण महत्त्वाचं असून, यासाठी माझ्या वेदना गौण असल्याचे म्हणत ते आंदोलनात सहभागी झाले. गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने ते वेळोवेळी आझाद मैदानावर जात असून, आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
कष्टाचं जीनं येणाऱ्या पिढ्यांना नको...विठ्ठल काळेंकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यातून कसाबसा संसार चालतो. उरलेला वेळ मजुरी करून घराचा गाडा हाकतो. मुलगी डॉक्टर व्हावी, मुलगा इंजिनीअर व्हावा, असं स्वप्न मी पाहतो. पण, पैशाअभावी त्यांचं शिक्षण थांबू नये. माझ्यासारखे अनेक समाजबांधव अशा स्थितीत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळणं आवश्यक असल्याचं काळे म्हणाले.
पाथरी तालुक्यातील आंदोलनाची परंपरापाथरी तालुक्यातील मराठा आंदोलनाची धग सुरुवातीपासूनच प्रखर आहे. गावागावांतून समाजबांधव सहभागी होत आहेत. त्यामुळे पाथरी तालुका मराठा आरक्षण लढ्यात जिल्ह्याचा कणा ठरत आहे.