जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट
परभणी : जिल्ह्यात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, ग्रामीण भागात काही गावांमध्ये आता पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गाव परिसरातील हातपंप, विहिरींची पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
कालव्यातील गाळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे कालव्याला सोडलेले पाणी टोकापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, कालव्याच्या लाभक्षेत्रात येऊनही अनेक शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने गाळ उपसून घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची शहरात दुरवस्था
परभणी : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अनेक स्वच्छतागृह परिसरामध्ये पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे हे स्वच्छतागृह बंद ठेवावे लागत आहेत. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
लघू व्यावसायिकांचे संचारबंदीमुळे नुकसान
परभणी : जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी लागू केल्याने लघू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दररोजच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने हे व्यावसायिक अडचणीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लघू व्यवसाय करण्यासाठी संचारबंदी सूट द्यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात रखडले पीक कर्जाचे वाटप
परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपासाठी बँकांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण केले नाही. कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारात खेटा मारल्या, परंतु त्यांच्या फायली प्रलंबित राहिल्याने, शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वसमत रस्त्याचे काम संथगतीने सुरू
परभणी : वसमत रस्त्यावर असोला पाटी ते झीरो फाटा या दरम्यान रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरचे काम संथगतीने सुरू असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे अडखळत वाहने चालवावी लागत आहेत.
वाळूअभावी बांधकाम व्यवसाय अडचणीत
परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे, परंतु वाळू घाटांचा लिलाव रखडले असल्याने, खुल्या बाजारात उपलब्ध होत नाही. त्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. वाळूचे भाव गगनाला भिडल्याने अनेक बांधकामे बंद ठेवण्यात आली आहेत. खुल्या बाजारात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.