कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४ मार्चपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठ मागील तीन दिवसांपासून बंद आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी शनिवारीदेखील शहरातील रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळाली. बाजारपेठ बंद आणि नागरिकांचा संचार सुरू अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक दिसत आहे. बाजारपेठ भागातील सर्वच्या सर्व दुकाने बंद असल्याने या भागात मात्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:17 IST