कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्हाभरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. गतवर्षी ७ ते ८ महिने लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी त्यांना समाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी धान्याची किट दिली होती. त्यामुळे त्यावेळी कसेबसे दिवस त्यांनी काढले होते. आता मात्र एकही सामाजिक संस्था किंवा दानशूर व्यक्ती पुढे येत नसल्याने या कुटुंबीयांची आबाळ झाली आहे. त्यातल्या त्यात घरोघरी जाऊन धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींना कोरोनाच्या भीतीतून अनेकांनी काम देणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न पडला आहे. शासनाने आता मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
एका घरातून मिळतात ५०० रुपये
घरोघरी जाऊन काम करणाऱ्या मोलकरणींना एका घरातून महिनाकाठी ५०० रुपये मिळतात. दिवसभरात ८ ते १० घरांमध्ये जाऊन या मोलकरणी धुणीभांडी, स्वयंपाक आदी कामे करतात. आता कोरोनामुळे त्यांचे सर्व काम बंद झाले आहे. त्यामुळे महिन्याकाठी मिळणारे चार पैसे त्यांचे बंद झाले आहेत.
दिवसभरात वेगवेगळ्या घरी जाऊन घरकाम करीत होते. त्यातून कुटुंबाचा खर्च भागवत होते. आता कोरोनामुळे सर्व काम बंद झाले आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. सरकारनेच आता आम्हाला मदत करावी.
अनिता मस्के, परभणी
माझे पती मजुरीचे काम करतात. मी घरकाम करते. कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून आम्हा दोघांचेही काम बंद झाले आहे. त्यामुळे काय खायचे, असा प्रश्न पडला आहे. घरातील खर्च, दवाखाना, लोकांचे देणे, या सगळ्याचा विचार करून चिंता वाटत आहे.
सरूबाई चव्हाण, परभणी
कोरोनामुळे गेल्या महिन्यातच काम बंद झालं आहे. त्यामुळे महिनाभर घरातच बसून आहे. या काळात जमवलेल्या चार पैशांवर घर चालवले. आता मात्र कठीण आहे. आणखी किती दिवस काम बंद राहणार, हे माहीत नाही. त्यामुळे झोप उडाली आहे.
अनिता कांबळे, परभणी