खड्डेमुक्त परभणीसाठी सरसावले लायन्स क्लब प्रिन्स

By राजन मगरुळकर | Published: January 21, 2024 04:19 PM2024-01-21T16:19:29+5:302024-01-21T16:19:54+5:30

वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत लायन्स क्लब प्रिन्स, वाहतूक शाखा यांच्या संयुक्त उपक्रमात

Lions Club Prince for pothole-free Parbhan | खड्डेमुक्त परभणीसाठी सरसावले लायन्स क्लब प्रिन्स

खड्डेमुक्त परभणीसाठी सरसावले लायन्स क्लब प्रिन्स

राजन मंगरुळकर
परभणी : शहरातील मुख्य रस्त्यावरील, सर्वच प्रभागातील जीवघेणे खड्डे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा जणू भाग बनले आहेत. नागरिकांनीच आपले प्रश्न सोडवले पाहिजेत, या भूमिकेतून लायन्स क्लब प्रिन्स क्लबने वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने खड्डे बुजविण्याचा अभिनव उपक्रम शनिवारी रात्री राबविला. शहरातील वसमत रोड तसेच स्टेशन रोड, बसस्थानक, उड्डाणपूल आणि जिंतूर भागात रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून बुजविण्यात आले.

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत रस्त्यावरील होणारे जीवघेण्या अपघाताचे कारण असणाऱ्या परभणीतील मुख्य रस्त्यावरील, प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे, खड्डे बुजवण्यासाठी लायन्स क्लब प्रिन्सच्या वतीने पुढाकार घेत वाहतूक शाखेचे सपोनि. वामन बेले, सर्व सहकारी यांच्या सहकार्याने शनिवारी रात्री विशेष मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम शिवाजी महाविद्यालयापासून सुरू झाली. डॉ. वसंतराव नाईक पुतळा, एसपी ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज चौकाभोवती असणारे खड्डे, मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्थानक, बस स्टॅंड उड्डाणपुलावरील गंगाखेड रोड आणि जिंतूर रोडकडे जाणारे लोखंडी उघडे पडलेले खड्डे, जिंतूर रस्त्यावरील साने चौक, अपणा कॉर्नर, मदिना हॉटेल परिसर या प्रमुख शहरी विभागातील प्रचंड मोठे खड्डे सहा ब्रास डांबरमिश्रित हॉटमिक्स खडी टाकून बुजविले. लायन्स क्लब प्रिन्स या सामाजिक संस्थेने शहरामध्ये रक्तदान शिबिरे, ब्लॅंकेट-खिचडी वाटप हेल्थ चेकअप, मेडिकल साहित्य जसे मेडिकल-बेड, व्हीलचेअर, शवपेटी गरजूंना वाटप करण्याच्या अनेक उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले; परंतु, शहरातील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भामध्ये उपक्रम राबवावा, याबाबत लायन्स क्लब प्रिन्सचे अध्यक्ष रोहित गरजे, मनोहर चौधरी, मयूर भाले, विकी नारवाणी, डॉ. प्रवीण धाडवे यांच्यावतीने पीटमेन ऑफ परभणी अर्थात ‘खड्डे कोणीही करा आम्ही ते बुजवू’ असा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी ॲक्टिव्हिटी चेअरमन प्रा.डॉ. सुनील मोडक यांनी नियोजन केले. शनिवारी रात्री सर्वांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत केले. रस्त्यावरील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेत सुरेश बायस, संतोष साखरे, उल्हास नाव्हेकर, डॉ. विठ्ठल घुले, राजकुमार भामरे, बंडू काकडे, श्रीनिवास भुतडा, हितेंद्र तलरेजा, पोउपनि. मकसूद पठाण, रवींद्र दीपक यांनी उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला.

Web Title: Lions Club Prince for pothole-free Parbhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.