कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना, रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनची किंमत १ हजार रुपयांच्या आसपास असली, तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र ते २ ते ३ हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शनिवारी अनेक नातेवाइकांना शहरातील विविध औषधी दुकाने, एजन्सी आणि कोरोना केंद्रांवर चकरा मारूनही हे इंजेक्शन मिळू शकले नाही. जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला आहे.
खाटांची माहिती दर्शनी भागात लावा
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांची धावपळ होत आहे. तेव्हा कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड आणि सर्वसाधारण बीडची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी नातेवाइकांमधून केली जात आहे.