मंठा ( जालना) : तालुक्यातील मंठा ते वाटूर रस्त्यावर केंधळी पाटी येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास टाटा सुमोने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील अंकुश रामराव तुरे (वय ४०) व अरुणा अंकुश तुरे (वय ३६) या पती-पत्नीचा मृत्यू झाला.
टाटा सुमो जीप (एमएच १२ एमबी ९५३६) वाटूरकडून मंठ्याच्या दिशेने येत होती, तर दुचाकी (एमएच १२ टीजे ४९१९) मंठ्याकडून वाटूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात टाटा सुमो जीपने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या जोगवाडा येथील अरुणा अंकुश तुरे व त्यांचे पती अंकुश रामराव तुरे हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातग्रस्तांना मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. महिला अपघातस्थळी जागेवर पडून मयत झाली. टाटा सुमोने दुचाकीला चालकासह अपघातस्थळापासून जवळपास दोनशे फुटापर्यंत फरपटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.