प्राचीन ठेव्याची उपेक्षा ! धारासूर येथील हेमाडपंती मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:45 PM2020-12-09T19:45:38+5:302020-12-09T19:48:22+5:30

धारासूर या गावात सुमारे १३ व्या शतकामध्ये हेमाडपंती चालुक्यकाळात ७२८ चौरस मीटर क्षेत्रात बांधलेले भूमिजन प्रकारचे गुप्तेश्वर मंदिर आहे.

Ignore the ancient deposit! Hemadpanti temple at Dharasur on the verge of extinction | प्राचीन ठेव्याची उपेक्षा ! धारासूर येथील हेमाडपंती मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

प्राचीन ठेव्याची उपेक्षा ! धारासूर येथील हेमाडपंती मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ फेब्रुवारी १९९८ साली प्राचीन व ऐतिहासिक स्मारक असल्याचे घोषितमंदिराच्या उत्तर व पश्चिमेकडील बाजू ढासळल्याने मोठी हानी गाभाऱ्यातील शिळा निसटून मंदिराची हानी होण्याची भीती

गंगाखेड: तालुक्यातील धारासूर येथे असलेले हेमाडपंती गुप्तेश्वर मंदिर देखभाल व दुरुस्तीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीत झालेल्या मंदिराच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. 

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या धारासूर या गावात सुमारे १३ व्या शतकामध्ये हेमाडपंती चालुक्यकाळात ७२८ चौरस मीटर क्षेत्रात बांधलेले भूमिजन प्रकारचे प्राचीनकालीन गुप्तेश्वर मंदिर आहे. हेमाडपंती चालुक्य काळात बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम दगडी शिळापासून केलेले आहे. तर शिखर विटापासून बनविलेले आहे. मंदिराच्या दगडी बांधकामावर सुंदर असे नक्षीकाम करून सुबक बांधणीच्या मंदिरावर चोहोबाजूंनी कोरलेले सूरसुंदरीचे चित्र अत्यंत मनमोहक असे आहे. या मंदिराला २७ फेब्रुवारी १९९८ साली राज्य शासनाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक असल्याचे घोषित केलेले आहे.

शेकडो वर्षांपासून उभे असलेले हे हेमाडपंती मंदिर पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरण्याबरोबर हॅरिटेज वॉक झालेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत गुप्तेश्वर मंदिराच्या उत्तर व पश्चिमेकडील बाजू ढासळल्याने व मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या शिळा अर्धा इंच इतक्या अंतरावर टेकलेल्या असल्याने गाभाऱ्यातील शिळा निसटून मंदिराची हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. गाभाऱ्यातील शिळा ढासळून भविष्यात मंदिरात येणाऱ्या भाविक-भक्तांसह मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना यापासून कुठलीही हानी होऊ नये, यासाठी मंदिरातील शिळांना पोलादी भीमचा टेका देऊन मंदिराची हानी टाळण्याची गरज असल्याची भावना धारासूरवासियांतून व्यक्त केली जात आहे. 

या मंदिराच्या जीर्णोद्धार व जतनासाठी ग्रामस्थांनी सुमारे २०१४ पासून राज्याचे पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक मंत्रालय तसेच शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही मंदिर जीर्णोद्धार व जतनासाठी निधी उपलब्ध झाला नाही. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धारासूरवासियांतून होत आहे.
 

Web Title: Ignore the ancient deposit! Hemadpanti temple at Dharasur on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.