परभणी : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने मनपा तसेच आरोग्य अधिकार्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोना रोखायचा पण... निधी कुठून आणायचा? असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करणे, त्यांची तपासणी करणे यासह इतर बाबींसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासत आहे. तसेच कोरोना केअर सेंटर्स वाढविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्यक असून, त्यासाठीही निधीचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात परभणी शहरात रुग्णांची संख्या अधिक आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपा प्रशासनाला निधी आवश्यक आहे. कोरोना केअर सेंटर वाढवणे, कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, कोरोना प्रतिबंधक औषधी आणि तपासणीसाठी लागणारा खर्च या बाबींवर खर्च होत आहे. मागील वर्षी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने निधीची मागणी केली होती. या निधीतूनच सध्याची कोरोनाची प्रतिबंधात्मक कामे केली जातात. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे.
२ कोटी ३६ लाखांची मागणी
परभणी शहरातील कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी महापालिका प्रशासनाने २ कोटी ३६ लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे. अद्याप ही रक्कम मनपाला प्राप्त झाली नाही. मात्र, मागील वर्षी मागणी केलेल्या निधीपैकी १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी प्रशासनाला उपलब्ध झाला असून, त्यातून सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
तपासण्यांवर परिणाम
शहरी भागात रुग्ण शोधण्यासाठी आरटीपीसीआर तपासण्या वाढवणे आवश्यक आहे. या तपासण्यांसाठी सध्या पुरेशा प्रमाणात कीट मनपाकडे उपलब्ध असले तरी भविष्यात कीट कमी पडू शकतात. त्याचप्रमाणे पीपीई कीट, हॅण्डग्लोव्हज् आदी साहित्य खरेदीसाठीही निधीची आवश्यकता आहे. मनपाने कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि औषधी खरेदीसाठीही निधी लागणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, कोरोना केअर सेंटर्स वाढविण्याची आवश्यकता आहे; परंतु प्रत्यक्षात तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांअभावी कोरोना केअर सेंटर बंद आहेत. सध्या सेलू आणि गंगाखेड या दोन ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. मात्र पाथरी, पूर्णा, मानवत, सोनपेठ, जिंतूर या ठिकाणची कोरोना केअर सेंटर कर्मचाऱ्यांअभावी बंद आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरु झाले तर शहरातील रुग्णालयांवर येणारा ताण कमी होऊ शकतो.